मुंबई : राज्यात कोरोनामुळे पोलीस दलावर आलेला कामाचा भार पाहता कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने निमलष्करी दलाच्या २० तुकड्या पाठविण्याची मागणी राज्य शासनाने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केली आहे.निमलष्करी दलामध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांतर्गतचे केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), केंद्रीय औद्योगिक पोलीस दल (सीआयएसएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स आणि दिल्ली पोलीस यांचा समावेश असतो.राज्याने मागणी केल्यानंतर या पाचपैकी कोणत्याही एका दलाचे जवान पाठवायचे की, वेगवेगळ्या दलांचे जवान पाठवायचे, याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालय करीत असते. एका तुकडीमध्ये २०० जवान असतात.आपण २० तुकड्या मागितल्या आहेत, याचा अर्थ दोन हजार जवानांची मागणी आपण केलेली आहे. निमलष्करी दल हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या, तर लष्कर हे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते. आम्हाला लष्कराची गरज नाही.राज्यातील प्रत्येक नागरिकच सैनिक बनून कोरोनाचा मुकाबला करील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच म्हटले आहे.पोलिसांचे मनोबल अजिबात खचलेले नाही : देशमुखराज्यातील दोन लाखांवर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आज कोरोनाच्या संकटाचा प्राणपणाने मुकाबला करीत आहेत. त्यांचे मनोबल तसूभरही कमी झालेले नाही. ते अत्यंत सक्षम आहेत; पण त्यांना विश्रांतीची कुठे ना कुठे गरज आहे.पोलीस दलातील काही अधिकारी, कर्मचारी यांनादेखील कोरोनाची बाधा झालेली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था परिस्थिती या पार्श्वभूमीवरकेंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची मागणी केली आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. ते म्हणाले की, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांचा उपयोग मुख्यत्वे कंटेनमेंट झोन तसेच कायदा व सुव्यवस्थेची स्थिती उत्पन्न झाल्यास त्या ठिकाणी केला जाईल.
coronavirus: निमलष्करी दल पाठवा; राज्याची विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 6:42 AM