मुंबई : बॉलिबूडचा किंग खानांपैकी एक असलेल्या शाहरुख खानने कोलकाता नाईट रायडर्स, रेड चिलीज एंटरटेनमेंट, मीर फाउंडेशन आणि रेड चिलीज व्हीएफएक्स या त्याच्या कंपन्यांद्वारे कोरोनाशी लढण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांची घोषणा केली आहे. यामध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोरोनाविरोधात लढण्यासाठी उभारलेल्या PM CARE फंडालाही मोठी मदत देऊ केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले प्रयत्न करत आहेत. त्यांच्या कोरोनाविरोधातील लढाईला आम्ही छोटी मदत करत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आणि अन्य राज्यांचे नेते या महामारीविरोधात लढा देत आहेत. तो कौतुकास्पद आहे. आम्ही मुंबई, कोलकाता आणि नवी दिल्ली या तीन शहरांवर सुरुवातीला लक्ष केंद्रीत केले आहे. मी आणि माझी टीम यथायोग्य मदत करत आहोत, असे शाहरूख खानने म्हटले आहे. याच बरोबर पुढे येणाऱ्या संकटांना खंबीरपणे तोंड देण्याची ताकद ठेवण्याचे आवाहनही शाहरूख खानने केले आहे.
या कठीण काळात अनेकजण मुलभूत गोष्टींपासून वंचित आहेत. त्यांना मदत करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सची सहमालक गौरी खान, शाहरुख खान, जूही चावला असे सारे पीएम फंडाला मदत करणार आहोत. याशिवाय महाराष्ट्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री मदत निधीसाठी रेड चिलीज एंटरटेन्मेंटद्वारे मदत देण्यात येत आहे.
आरोग्य यंत्रणेसाठी ५०००० पीपीई किट्स देण्यात येणार आहेत. यासाठी शाहरुखची केकेआर आणि मीर फाऊंडेशन मदत करणार आहे. तसेच मीर फाऊंडेशनद्वारे मुंबईतील ५५०० कुटुंबांसाठी महिनाभर जेवण दिले जाणार आहे. तसेच २००० लोकांना ताजे जेवण मिळण्यासाठी व्यवस्थाही करण्याता आली आहे. रोटी फाऊंडेशनसोबत मीर फाऊंडेशन काम करणार आहे. यासाठी तीन लाख जेवणाचे किट्स दिले जाणार आहेत. तसेच मीर फाऊंडेशनद्वारे १०० अॅसिड अटॅक झालेल्या महिलांना स्टायपेंड दिला जाणार आहे.