मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने अनेकजण मदतीसाठी सरसावले आहेत. काँग्रेसने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आमदार, खासदारांचे वेतन देण्याचं घोषित केल्यानंतर आज राष्ट्रवादीनेही पक्षाच्या वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये तर राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण २ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत देत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे ट्रस्टी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून यापूर्वी कधीही न पाहिलेल्या आपदेला तोंड देत आहे. राज्यातील जनता व प्रशासन या आपदेसोबत जोमाने लढत असले तरी एकूणच जगभराचा आर्थिक विकास मंदावला असल्याने राज्याच्या तिजोरीवर ताण पडत आहे. तसेच राज्यातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला असल्याने राज्याच्या तिजोरीवर आधीपेक्षा अधिक भार पडणार आहे त्यासाठी राष्ट्रवादीकडून ही मदत देण्यात आली आहे.
त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रत्येक आपत्तीत महाराष्ट्राला सहाय्य करण्यास कटिबद्ध आहे. म्हणूनच कोरोना सोबत लढण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये तर राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण दोन कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी नागरिकांच्या सहाय्यासाठी तत्पर असल्याचे सांगतानाच या निधीचा स्वीकार करावा अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे. शरद पवारांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर लगेच राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांना चिठ्ठी पाठवून सूचना केली. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे ट्रस्टी अजित पवार, ट्रस्टी आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ट्रस्टी आणि खासदार सुप्रिया सुळे, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजी गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, मुंबईच्या युवती अध्यक्षा अदिती नलावडे यांनी केली आहे.
राज्यातील गुरुवारी दिवसभरात ६६,१५९ रुग्ण, तर ७७१ मृत्यू
राज्यात दैनंदिन रुग्ण आणि मृत्यू वाढीचा आलेख कायम असून गुरुवारी दिवसभरात ६६ हजार १५९ रुग्णांचे निदान झाले असून ७७१ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. तर रुग्ण निदानाच्या तुलनेत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या अधिक आहे. दिवसभरात ६८ हजार ५३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ३७ लाख ९९ हजार २६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ६ लाख ७० हजार ३०१ रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.६९ टक्के असून मृत्यूदर १.५ टक्क्यांवर स्थिरावला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ६८ लाख १६ हजार ७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.९३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.. राज्यात एकूण ४५ लाख ३९ हजार ५५३ कोरोनाबाधित असून आतापर्यंत ६७ हजार ९८५ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे.