मुंबई : राज्यातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी नियमावली बनविली जात आहे. मात्र, या नियमांची महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या नेत्यांकडून पायमल्ली होताना दिसून येत आहे.
विशेष म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनामुळे गर्दी करू नका, असे जनतेला आवाहन केले आहे. तसेच, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनाही त्यांनी 15 दिवस नागरिक, मतदार किंवा लोकांचा जमाव एकत्र येऊन जमा होतील, अशा प्रकारचे कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असा आदेश दिला. मात्र, शिवेसनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री आणि पक्ष नेतृत्त्वाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही शिर्डीत साई परिक्रमा काढण्यात आली. या साई परिक्रमेत ग्रामस्थ तसेच देशभरातून आलेले भाविक मोठ्या संख्येने सामील झाले होते. 14 किलोमीटर अंतर पार करत साई परिक्रमा यात्रा द्वारकामाई मंदिरापर्यंत आल्यानंतर समाप्त झाली. विशेष म्हणजे, शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे या परिक्रमेत सहभागी झाल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन करूनही त्याची पर्वा न करता सदाशिव लोखंडे यांनी साई परिक्रमेला उपस्थिती दर्शवली.
या परिक्रमेच्या कार्यक्रमाला प्रांताधिकारी यांनी परवानगी रद्द केल्याचे जाहीर केले होते. साई परिक्रमेचे आयोजक ग्रीन शिर्डी क्लिन शिर्डीच्या वतीने देखील परिक्रमा स्थगित केल्याचे पत्र देण्यात आले होते. तरीसुद्धा भाविकांनी परिक्रमा पूर्ण केली. कोरोना व्हायरस पासून मुक्ती मिळावी अशी प्रार्थना या माध्यमातून केल्याचे स्थानिक भाविकांनी सांगितले.
दरम्यान, याआधी ठाण्याच्या वर्तकनगर, शिवाईनगर परिसरातील शिवसैनिक दिशा ग्रुपचे भास्कर बैरीशेट्टी आणि त्यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका असणार्या पत्नी रागिणी बैरीशेट्टी यांच्या आशीर्वादाने पोखरण रोड येथील उन्नती गार्डन मैदानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश डावलून तीन दिवसीय मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्याचे शहरभर होर्डिंग लावत दिमाखदार उद्घाटनही झाले. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांकडून नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.