नाशिक- मुंबई, ठाणे, शहापूर आणि अन्य परिसरातून अन्य परिसरातून नाशिकसह उत्तर महाराष्ट्राकडे निघालेल्या सुमारे पाच ते सहा हजार नागरिकांना इगतपुरी येथे जिल्ह्याच्या सीमाबंदीमुळे थांबावे लागले आहे. या स्थलांतरितांना येथे थांबवण्यास स्थानिक नागरिकांनी प्रचंड विरोध सुरू केला आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी राज्य शासनाने जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत त्यामुळे अन्य जिल्ह्यात असलेल्या नागरिकांना आपल्या मूळ गावी जाण्यात अडचणी येत आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, शहापूर कसारा यासह अन्य भागात नाशिक सह उत्तर महाराष्ट्रातील अनेक चाकरमाने आणि कष्टकरी कामासाठी वास्तव्यास होते. मात्र आता कोरोना मुळे उद्योग आणि व्यवसाय बंद झाल्याने सबधितांना आपल्या मूळ गावी जाण्याची घाई झाली आहे. त्यामुळे मिळेल त्या साधनाने आणि बहुतांशी पायपीट करत नागरिक नाशिक जिल्ह्याच्या प्रवेशद्वाराशी म्हणजे इगतपुरीत आले आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या सीमा सील केल्यामुळे त्यांना नाशिक मध्ये प्रवेश करणे कठीण झाले आहे. त्यामुळे या सर्व नागरिकांचा सध्या इगतपुरीत मुक्काम आहे. बाहेरून मोठ्या प्रमाणात नागरिक आल्याने इगतपुरीतील नागरिक धास्तावले आहेत. त्यांनी या स्थलांतरितांना हटवण्याची मागणी सुरू केली आहे.
coronavirus : सीमाबंदीमुळे इगतपुरी अडकले सहा हजार नागरिक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 3:08 PM