मुंबई : एसटी महामंडळाचा संचित तोटा 6 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढला आहे. आता कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्यभरातील सुमारे 18 हजार फेऱ्या रद्द केल्या जात आहेत. परिणामी दररोज सुमारे 22 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. त्यामुळे 24 मार्च ते 31 मार्च पर्यंत सुमारे 154 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले असल्याची माहिती एसटीतील सूत्रांनी दिली. लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत असल्याने सुमारे 462 कोटी रुपयाचे उत्पन्न बुडण्याची शक्यता आहे.
वारंवार होणारे अपघात, नादुरुस्त एसटी, घुसमटणारी रचना यामुळे प्रवाशांनी एसटीला पाठ दाखविली. त्यामुळे एसटी महामंडळाचे चाक तोट्याच्या खड्यात रुतले आहे. आता कोरोना आणि लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाच्या दररोज हजारो फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. त्यामुळे कोट्यवधीचे उत्पन्न बुडत आहेत. परिणामी, आधीच आर्थिक तोट्यात असलेल्या एसटीचा पाय आणखी खोलात गेला.
प्रत्येक सामान्य प्रवासी रेल्वेनंतर एसटीला पसंती देतो. त्यामुळे रेल्वेचे तिकीट आरक्षित झाले नाही किंवा रेल्वे रद्द झाल्यावर प्रवासी एसटीतून प्रवास करण्याला पसंती देतात. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे एसटी बंद झाली आहे. फक्त मुंबई, पालघर, ठाणे या जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा पुरविली जात आहे. परिणामी, एसटीला आर्थिक तोट्याचा सामोरे जावे लागण्याची शक्यता एसटीच्या कर्मचारी संघटनेकडून व्यक्त केली जात आहे.