मुंबई - राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटाच्या काळात राज्याचे नेतृत्व करत असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या पदावरील तांत्रिक संकट अखेर दूर झाले आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना उद्धव ठाकरे हे कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने सहा महिन्यांच्या आत दोन्हीपैकी एका सभागृहाचे सदस्य म्हणून निवडणून येणे आवश्यक होते. मात्र कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर टाकण्यात आल्याने विधिमंडळाच्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसलेल्या उद्धव ठाकरे यांच्या पदावर तांत्रिक संकट निर्माण झाले होते. मात्र राज्य मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय घेत हे तांत्रिक संकट दूर केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांपैकी दोन जागा रिक्त झाल्या आहेत. त्यापैकी एका जागेवर उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करावी, अशी शिफारस मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे केली. दरम्यान, आज झालेल्या या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित होते.
राज्यावर आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे अनेक शासकीय निर्णय निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्यातील विधान परिषदेची निवडणूकही लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे सध्या संकटकाळात समर्थपणे राज्याचे नेतृत्व करत असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदावर तांत्रिक संकट निर्माण झाले होते. मात्र राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या पदावरील तांत्रिक संकट दूर झाले आहे.