मुंबई: कोरोना संकट काळात राज्य सरकारनं विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. व्यवसायिक/बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाच्या/शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात आला आहे. विद्यापीठांनी ठरवलेल्या सुत्रानुसार शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना पदवी दिली जाईल. मुख्यमंत्री कार्यालयानं ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. व्यवसायिक आणि बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाच्या/अंतिम सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करत असल्याची माहिती ठाकरे सरकारनं पंतप्रधान मोदींना पत्राद्वारे दिली आहे. या विद्यार्थ्यांना विद्यापीठानं ठरवलेल्या सुत्रानुसार पदवी देण्यात येईल. यासाठी मोदींनी संबंधित अभ्यासक्रमांच्या शिखर संस्थांना योग्य त्या सूचना द्याव्यात, असं आवाहन ठाकरे सरकारकडून करण्यात आलं आहे. व्यवसायिक आणि बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांबद्दलचे निर्णय घेणाऱ्या ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चर, बार काऊन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल काऊन्सिल फॉर टीचर एज्युकेशन आणि नॅशनल काऊन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या शिखर संस्थांना राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाला मंजुरी देण्याचे आदेश मोदींनी द्यावेत, असं आवाहन ठाकरे सरकारकडून पत्रातून करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याआधी पंतप्रधान मोदींनी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचं आवाहन पत्राद्वारे केलं होतं. एमडी, एमएस, डीएम परीक्षा पुढे ढकलण्याचे आदेश मोदींनी मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाला द्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पत्रातून केली होती. अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी कोरोना संकटाच्या काळात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. निवासी डॉक्टर म्हणून ते सध्या मोलाची कामगिरी करत आहेत. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलून त्यांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांनी केली होती.