मुंबई : लक्षणे नसलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी न करण्याचा निर्णय परत घेण्याची तसेच आयसीएमआरच्या निकषांचे तंतोतंत पालन करण्याची विनंती पुन्हा एकदा करीत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या आकडेवारीतील घोळ दूर करूनच कोरोनाविरूद्धचे हे युद्ध आपल्याला प्रभावीपणे लढता येईल, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या आशयाचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी पाठविले.मुंबई महापालिकेने लक्षणे नसलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी बंद करण्याचा निर्णय घेतला. याठिकाणी राज्य सरासरीच्या कितीतरी अधिक नमूने पॉझिटिव्ह आले आहेत, हे आपल्याला नाकारता येणार नाही. म्हणूनच आयसीएमआरच्या नव्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ‘अॅग्रेसिव्ह टेस्टिंग’ हीच रणनीती आता वापरावी. लक्षणे नसलेल्या अतिजोखमीच्या व्यक्तींसंदर्भात १०० टक्के चाचण्या केल्याच पाहिजेत, असे दिशानिर्देश आयसीएमआरने स्पष्टपणे दिले असताना आम्ही मात्र आवश्यकता वाटली तर करता येईल, असा आदेश काढला आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधीद्रव्य विभागाच्या १८ एप्रिलच्या अहवालानुसार राज्यात उपलब्ध केसेसपैकी ६३ टक्के रूग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. तर रूग्णालयात दाखल झालेल्यांपैकी ७९ टक्के रूग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. याचाच अर्थ लक्षणे नसलेल्या व्यक्तींच्या चाचण्या न करण्याचा निर्णय किती घातक ठरू शकतो, हे स्पष्ट होते. त्यामुळे सांख्यिकीदृष्ट्या ही रूग्णसंख्या कमी दिसेल आणि प्रत्यक्षात मात्र धोका वाढेल. त्यामुळे असे निर्णय करणे योग्य होणार नाही, असे फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे.१८ एप्रिलला मुंबईतील पॉझिटिव्ह रूग्णांची सरकारची संख्या १८३ इतकी होती. तर मुंबई महापालिकेची ८७ होती. अशी तफावत का येत आहे, असे ते म्हणाले.
CoronaVirus: लक्षणे नसलेल्या व्यक्तींची चाचणी करा- देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 3:49 AM