प्रवीण खेते ।लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यात कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला असून, २७ जिल्हे महामारीने प्रभावित झाले आहेत. गत दोन दिवसात या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे; मात्र राज्यातील ९ जिल्हे असेही आहेत, ज्या ठिकाणी आतापर्यंत एकही कोरोनाचा बाधित रुग्ण आढळला नाही. ही बातमी दिलासादायक असली, तरी आणखी काही दिवस सतर्कता बाळगण्याची गरज आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे राज्यभरात संचारबंदी लावली. शिवाय, जिल्ह्यांच्या सीमाही सील केल्यात. त्यामुळे राज्यांतर्गत होणाऱ्या स्थलांतरणाला आळा घालणे शक्य झाले. त्याचा सकारात्मक परिणामही दिसून येत आहे. तर दुसरीकडे राज्यातील कोरोना प्रभावित जिल्ह्यांमध्ये बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मृत्यूदरही वाढत आहे. ही राज्यासाठी चिंताजनक बाब असली, तरी संचारबंदी आणि सीमाबंदीमुळे राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये अद्याप एकही बाधित रुग्ण आढळला नाही, ही दिलासा देणारी बातमी आहे. या जिल्ह्यांमध्ये बाधित रुग्ण नसला, तरी रोज संदिग्ध रुग्णांच्या संख्येत मात्र लक्षणीय वाढ आहेत आहे. अशा परिस्थितीत घाबरुन न जाता कोरोनाशी दोन हात करत घरातच थांबणे योग्य ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
सोशल डिस्टन्सिंगची गरजराज्यातील या ९ जिल्ह्यांमध्ये परिस्थिती नियंत्रणात असली, तरी अनेकांकडून बेफीकरी केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. बहुतांश लोक कारण नसताना घराबाहेर पडत आहेत. सार्वजनिक ठिकाणी विशेषत: भाजी बाजारात गर्दी करत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. त्यामुळे कोरोनापासून दूर असलेल्या या जिल्ह्यांमध्येही धोका कायम आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची गरज आहे.
कोरोनामुक्त जिल्हे :बीड, भंडारा, धुळे, गडचिरोली, नांदेड, नंदुरबार, परभणी, सोलापूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत एकही बाधित रुग्ण नाही.
नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची गरज आहे. आणखी काही दिवस नागरिकांनी घराबाहेर निघणे टाळल्यास कोरोना विरुद्धची लढाई नक्कीच जिंकू. नागरिकांनी संयम पाळावा.- डॉ. राजकुमार चव्हाण,जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.