मुंबई- देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रचंड हाहाकार माजविला. आता ही लाट ओसरत असतानाच महाराष्ट्र कोवीड-19 टास्क फोर्सने तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. गेल्या तीन दिवसांतील गर्दी पाहता आणि कोरोना व्हायरस प्रोटोकॉलचे योग्य पद्धतीने पालन केले गेले नाही, तर कोरोनाची संभाव्य तिसरी लाट (CoronaVirus Third wave) दोन ते चार आठवड्यातच महाराष्ट्र अथवा मुंबईला धडकू शकते, असे महाराष्ट्र कोवीड-19 टास्क फोर्सने म्हटले आहे. (CoronaVirus Third wave could hit as early as in 2-4 weeks, says Maharashtra Covid-19 task force)
तथापि, निम्न मध्यम वर्गाच्या समुहावर जेवढा परिणाम होतो, तेवढा परिणाम मुलांवर होणार नाही, असेही यावेळी म्हणण्यात आले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तयारीसंदर्भात समीक्षेसाठी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत टास्क फोर्सने हा अंदाज वर्तवला आहे. यावेळी टास्क फोर्सचे सदस्य, राज्याचे आरोग्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
या बैठकीत सादर केलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेदरम्यान राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होऊ शकते. तसेच, सक्रीय रुग्णांची संख्या 80 लाखवर पोहोचू शकते. तसेच, कोरोनाच्या पहिल्या लाटेत राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 19 लाख नोंदवली गेली. तर दुसऱ्या लाटेत ही संख्या वाढून 40 लाखांवर पोहोचली, असेही या बैठकीत सांगण्यात आले आहे. तथापि, यात मागील दोन लाटांप्रमाणेच 10 टक्के रुग्ण हे मुले आणि तरूण असू शकतात, असा अंदाजही यावेळी वर्तवण्यात आला आहे.
यावेळी टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले, “दुसरी लाट ओसरल्यानंतर केवळ चार आठवड्यातच इग्लंडला तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागत आहे. यामुळे, आपण सतर्क झालो नाही आणि कोरोना व्हायरस प्रोटोकॉलचे योग्य पद्धतीने पालन केले गेले नाही, तर आपल्यावरही ती वेळ येऊ शकते.”
“अनियंत्रित गर्दी आणि मास्क लावणे तसेच गरज नसताना घराबाहेर न पडणे, यांसारख्या कोरोना नियमांकडे दुर्लक्ष करणे हे अत्यंत चिंताजनक आहे. मुंबईत काही ठराविक वेळेत निर्बंध असतानाही, दिवसभर लोकांची ये-जा सुरूच असते," असे या बैठकीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.