मुंबई - वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे भारतात आतापर्यंत चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 195 पर्यंत पोहोचली आहे. भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही रोज वाढत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून कोरोनाग्रस्तांची संख्या 52 वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. पाच जणांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याची दिलासादायक माहितीही त्यांनी दिली आहे.
राजेश टोपे यांनी शुक्रवारी (20 मार्च) पत्रकार परिषदेत राज्यातील कोरोनाविषयक परिस्थितीची माहिती दिली. 'राज्यातील जे कोरोनाग्रस्त आहेत त्यापैकी 5 जणांना डिस्चार्ज देण्याची शक्यता आहे. मात्र त्यांना आणखी काही दिवस होम क्वारेंटाइन राहावं लागणार आहे. त्यामुळे मी राज्यातील जनतेला सांगू इच्छितो की, नागरिकांना घाबरून जाऊ नये. कोरोना झाल्यानंतरही रुग्ण बरे होतात. राज्यातील 1035 रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांची टेस्ट करण्यात आली. त्यापैकी 971 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. काल आणखी पाच जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. अतिदक्षता विभागातील उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत करत आहे' असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
राज्यात आणखी तीन नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पुणे, मुंबई आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी एकाला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचं निष्पन्न झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. 'पंतप्रधान यांनी जे काल आव्हान केले. रविवारी सेल्फ कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे त्याला जनतेने 100% प्रतिसाद दिला पाहिजे, या आजारातून मुक्त होण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्यातील जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री आज पुन्हा संवाद साधणार असल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली आहे.
'मुंबईत येत असलेल्या प्रवाशांसाठी क्वारेंटाइन करण्यात येत आहे. बाहेरून आणण्यात येणाऱ्या नागरिकांची तेथेच तपासणी करण्यात येईल. निगेटिव्ह रिर्पोट आल्यानंतर त्यांना भारतात आणण्यात येईल. मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी तूर्भेतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयातही क्वारेंटाइनची व्यवस्था करण्यात येईल. आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. अजूनही लोकलमध्ये गर्दी दिसून येत आहे. सार्वजनिक वाहतुकीवरील भार कमी करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रसंगी कठोर निर्णय घेतले जाईल' अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
भारतातील रुग्णांची संख्या 195 पर्यंत पोहोचली आहे. भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही रोज वाढत आहे. 163 भारतीयांना आणि 32 परदेशी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली आहे. देशातील 20 राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आहेत. यातील 20 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत दिल्लीमध्ये एक, कर्नाटकात एक आणि महाराष्ट्रात एक आणि पंजाबमध्ये एक अशा एकूण 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल, छत्तीसगड, पद्दूच्चेरीमध्ये 1, दिल्लीमध्ये 17, हरियाणामध्ये 17, कर्नाटकात 15, केरळमध्ये 28, महाराष्ट्रात 49, पंजाबमध्ये 2, तेलंगणामध्ये 16, गुजरात 2, राजस्थान 7, उत्तर प्रदेशमध्ये 19, लडाख 10, तमिळनाडू 3, जम्मू-काश्मीर 4 व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : देशातील 20 राज्यांत कोरोनाग्रस्त, रुग्णांची संख्या 195 वर
Coronavirus : धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने इस्राईलमध्ये भारतीयाला चिनी समजून मारहाण
Coronavirus : कोरोनाचा कोट्यवधी लोकांना फटका बसणार, जगभरात बेरोजगारांची संख्या वाढणार
Nirbhaya Case : 'निर्भया'चे दोषी फासावर लटकल्यानंतर अरविंद केजरीवालांचा मोठा संकल्प