मुंबई : कोरोनाचे संकट असताना राज्यातील खासगी डॉक्टरांनी भीतीपोटी दवाखाने बंद ठेवू नयेत. अशा परिस्थितीत संवेदनशीलता दाखवून डॉक्टरांनी रुग्णालये सुरू करून नागरिकांना सेवा द्यावी. बाधित रुग्णांपासून जवळच्या व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेऊन राज्य शासनाकडून सध्या अशा व्यक्तींचे ट्रेसिंगनंतर त्यांची टेस्टिंग आणि ट्रिटमेंट म्हणजेच शोध, तपासणी आणि उपचार या त्रिसूत्रीप्रमाणे काम करण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून केले.राज्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होत असून १९ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आल्याचे सांगत राज्यात सध्या १३५ रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना दिली. शासकीय आरोग्य सेवेतील डॉक्टर्स, कर्मचारी वर्ग, तसेच अन्य आपत्कालीन सेवेतील कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत, अशी सेवा देणाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याबाबत राज्य शासन विचार करीत आहे. गरोदर महिला, लहान मुलांचे आजार, हृदयविकाराचे रुग्ण यांना वेळीच उपचारांची गरज असते. त्यामुळे राज्यभरातील खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू ठेवावेत. कोरोनाच्या भीतीपोटी दवाखाने बंद ठेवू नका. संचारबंदीच्या काळात पोलीस आवश्यक ते सहकार्य करतील.
CoronaVirus : ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रिटमेंट त्रिसूत्रीनुसार कोरोनाचा प्रतिबंध - आरोग्य मंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 1:48 AM