मुंबई - देशासोबतच राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचे वाढत असलेले आव्हान पाहता या आव्हानाचा सामना करण्यासाठी राज्यातील प्रशिक्षित नर्स तसेच लष्करातून निवृत्त झालेल्या आणि वैद्यकीय सेवेचा अनुभव असलेल्या जवानांना मोठे आवाहन केले आहे.
जनतेला संबोधित करताना मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रशिक्षित नर्स, रुग्णालय कर्मचारी आणि माजी सैनिकांना आवाहन केले. ते म्हणाले की, कोरोनविरोधात आपण लढाई लढत आहोत. या लढाईमध्ये अनेकांची साथ लागणार आहे. आपल्या राज्यात जे प्रशिक्षित नर्स, रुग्णालय कर्मचारी आहेत, त्यांच्यापैकी जे कुणी सेवेत नसतील. त्यांनी या लढाईत लढण्याची मानसिक इच्छा असेल तर पुढे यावे. तसेच लष्करातील निवृत्त जवान ज्यांना वैद्यकीय सेवेचा अनुभव आहे त्यांनी सेवा देण्यासाठी पुढे यावे. अशा प्रकारच्या सेवेत यायची ज्यांची इच्छा असेल त्यांनी Covidyoddha@gmail.com या संकेतस्थळावर अर्ज पाठवावा, या महाराष्ट्राला तुमची गरज आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढत आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातल्या जनतेशी संवाद साधला. रुग्णांची संख्या नेमकी कशामुळे वाढतेय, हे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. परिस्थिती नक्की नियंत्रणात येईल. तुम्ही मला अशीच साथ देत राहा, असं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं.
दरम्यान, 'गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णांची संख्या वेगानं वाढतेय. हे प्रमाण आपल्याला शून्यावर आणायचं आहे. मात्र रुग्णसंख्येच्या वाढीमागचं कारण समजून घ्यायला हवं,' असं मुख्यमंत्री म्हणाले. आपण आता रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याची वाट पाहत नाही. तर घरोघरी जाऊन लोकांच्या चाचण्या करत आहोत. चाचण्यांची संख्या आपण मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसतंय, असं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाग्रस्तांना लवकर उपचार मिळावेत आणि त्यांच्या संपर्कात आल्यानं इतरांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी घरोघरी जाऊन चाचण्या करण्यावर भर देत असल्याचं त्यांनी सांगितलं.