मुंबई : विधानसभा सदस्याद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी होणारी निवडणूक कोरोना संकटामुळे अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदभार्तील आदेश जारी केले आहेत. याच ९ पैकी एका जागेवर मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे निवडून जातील असे मानले जात होते; मात्र आता ही निवडणूकच पुढे ढकलल्याने ठाकरे यांच्यासमोर काहीसा पेच निर्माण होऊ शकतो. मात्र त्यातून निश्चितच मार्ग निघेल. कारण दोन-तीन पर्याय खुले आहेत, अडचण येणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली.
ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. आपल्याला सहा महिन्यांच्या आत विधीमंडळाचे सदस्य होणे बंधनकारक असेल, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे यांना त्याचवेळी लेखी दिले होते. त्यामुळे ठाकरे यांना येत्या २७ मे पर्यंत आमदार होणे आवश्यक असेल.विधान परिषदेतील राष्ट्रवादीचे सदस्य हेमंत टकले, आनंद ठाकूर,किरण पावसकर, काँग्रेसचे हरिभाऊ राठोड, शिवसनेच्या नीलम गो-हे, भाजपचे अरूण अडसड, पृथ्वीराज देशमुख, स्मिता वाघ आणि पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले व आता शिवसेनेत असलेले चंद्रकांत रघुवंशी या सदस्यांची मुदत येत्या २४ एप्रिल रोजी संपत आहे. यापैकी रघुवंशी यांनी राजीनामा दिला आहे.
मुख्यमंत्र्यांसमोर तीन पर्यायमाजी विधान मंडळ सचिव अनंत कळसे यांच्या मते मुख्यमंत्र्यांसमोर तीन पर्याय असू शकतील.१. विधान परिषदेची ९ जागांची निवडणूक २७ मे रोजी होऊन त्यात ते निवडून येऊ शकतात.२. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत राज्यपाल नियुक्त एखादे विधान परिषद सदस्य राजीनामा देतील आणि त्या जागी उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाऊ शकतात. नंतर विधान परिषदेच्या नियमित द्वेवार्षिक निवडणुकीत ठाकरे निवडून येऊ शकतात.३, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी म्हणजे त्यांना विधिमंडळ सदस्य होण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा अवधी मिळू शकेल.