गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थिथीत रुग्णसंख्या कमी व्हावी आणि साखळी तोडली जावी यासाठी राज्य सरकारनं निर्बंध घातले आहेत. आता ते निर्बंध १५ मे पर्यंत वाढवण्यात आले आहेत. अशा परिस्थितीही गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं नव्या कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांच्या वरच दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६६,१५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ७७१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात गेल्या चोवीस तासांत ६६,१५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असली तरी दुसरीकडे ६८,५३७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३७,९९,२६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या ६,७०,३०१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ८३.६९ टक्क्यांवर आला आहे.
मुंबईत ४ हजारांपेक्षा अधिक नवे रुग्णमुंबई गेल्या चोवीस तासांमध्ये ४,१९२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर दुसरीकडे ५,६५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण ५,६६,०५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर आता ८८ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईत ६४,०१८ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर दुसरीकडे रुग्ण दुपटीचा कालावधीही ७९ दिवसांवर गेला आहे.