नवी दिल्ली - कोरोनापुढे सध्या सर्वच देश हतबल आहेत. आशात कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी जगभरातील अनेक फार्मा कंपन्या कंबर कसून लस तयार करण्याच्या कामात लागल्या आहेत. अनेक कंपन्यांनी तर लसीच्या शेवटच्या टप्प्यावरील परीक्षणालाही सुरुवात केली आहे. मात्र, कोरोला लशीवरील काम जस-जसे पुढे जात आहे, तस-तसे फार्मा कंपन्यांवर सायबर हल्ला होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आता हॅकर्सचा डोळा भारतीय फार्मा कंपन्यांवर आहे.
गेल्या 15 दिवसांपूर्वीच प्रसिद्ध फार्मा कंपनी 'डॉक्टर रेड्डीज लॅब'वर सायबर हल्ला झाला होता. तर आता मुंबईतील प्रसिद्ध फार्मा कंपनी लुपिनवर सायबर हल्ला झाल्याचे वृत्त आहे.
औषध उद्योगांशी संबंधित अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत लशीसंदर्भातील सायबर हल्ले पश्चिमेकडील देशांमध्ये होत होते. ते आता संपूर्ण जगात होत आहेत. आता भारतातील फार्मा कंपन्या कोरोना लशीच्या जागतीक साखळीचा भाग आहेत. यामुळे या कंपन्यांवर हॅकर्सचा डोळा आहे. तज्ज्ञांच्या मते, असेच सायबर हल्ले भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे.
असे मानले जाते, की लशीची माहिती मिळवण्यासाठी आणि या लशीच्या पुरवठा साखळीच्या माहितीसाठी हॅकर्स सायबर हल्ले करत आहे. भारतातील एका लस निर्माता कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, देशातील अधिकांश फार्मा कंपन्यांनी आपले दस्तऐवज आणि उत्पादन प्रक्रियेशी संबंधित डाटा गेल्या दशकातच डिजिटल स्पेसमध्ये टाकला आहे. गेल्या वर्षीच या डिजिटलायझेशनच्या धोक्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तेव्हा सायबर सिक्योरिटी सेवा पुरवणारी संस्था कास्परस्कायने भारत हा सायबर हल्ल्यांसाठी 6वा सर्वात संवेदनशील देश असल्याचे म्हटले होते. एवढेच नाही, तर येथे औषध तयार करणाऱ्या कंपन्यांना सायबर हल्ल्याचा सर्वाधिक धोका आहे, असेही या संस्थेने म्हटले होते.
तज्ज्ञांच्या मते, भारतातील फार्मा कंपन्या कोरोना व्हायरस काळात स्वस्त आणि मोठ्या प्रमाणावर औषध पुरवठा करण्यात महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. यामुळेच सायबर गुन्हे गारांचे लक्षही याकडे वळले आहे. जगभरातील मोठ्या कंपन्यांबरोबरच भारतीय फार्मा कंपन्यांवर सायबर हल्ले वाढण्याचा अर्थ, कोरोना लस तयार करण्याच्या शर्यायतीत असलेल्या देशांच्या यादीत भारतही आहे. भारतात रशियन कोरोना लस स्पूतनिक-Vच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षणाला परवानगी मिळाल्यानंतरच डॉक्टर रेड्डीज लॅबवर सायबर हल्ला झाला होता. डॉक्टर रेड्डीज लॅब प्रमाणे, लुपिन कुठल्याही लशीच्या परीक्षणाच्या कामात नाही. या दोन्ही कंपन्यांनी स्पष्ट केले आहे, की या सायबर हल्ल्याचा त्यांच्या आधारभूत कामावर कसल्याही प्रकारचा परिणाम झालेला नाही.