मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर येथे 31 मार्चपर्यंत खासगी ऑफिस आणि दुकाने बंद राहणार आहे. मात्र, यादरम्यान अत्यावश्यक सेवा म्हणजेच बँका, सार्वजनिक वाहतूक, बाजारपेठा, किराणा मालाचे दुकान, दुधाचे दुकान, रुग्णालये, छोटे रेस्टॉरंट सुरु राहणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा राज्यातील जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी जीवनावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद करण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. खासकरून मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवड, नागपूर या मोठ्या शहरांत सर्व कार्यालये, दुकाने बंद राहतील. राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती 25 टक्क्यांवर आणली आहे. यापूर्वी ती 50 टक्क्यांवर आणली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
याचबरोबर, 'रेल्वे आणि बस या आपल्या शहराच्या वाहिन्या आहेत. त्या बंद करणे सोपे आहे, पण त्या बंद केल्यानंतर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांवर परिणाम होईल. महापालिका कर्मचारी, डॉक्टर यांची ने-आण कशी होईल. तूर्त या दोन सेवा बंद न करता राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थितील 25 टक्क्यांवर आणली आहे. जीवनाश्यक वस्तू व्यक्तिरिक्त सर्व गोष्टी बंद. ही बंदी 31 मार्चपर्यंत असेल' अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. याशिवाय, पुढे आर्थिक संकट उद्भवेल, याचा मुकाबला कसा करायचा यावर उपाययोजना सुरु आहे. त्यावर मात करण्यासाठी अभ्यास गट नेमण्यात आले आहेत. जे कर्मचारी घरी आहेत, त्यांचा पगार मालकांनी कापू नये, माणुसकी टिकवण्याची वेळ आहे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
दरम्यान, चीनमधील व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे भारतात आतापर्यंत चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 195 पर्यंत पोहोचली आहे. भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही रोज वाढत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून कोरोनाग्रस्तांची संख्या 52 वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली आहे. तसेच, पाच जणांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याची दिलासादायक माहितीही त्यांनी दिली आहे.