मुंबई – राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसल्यानंतर आता हळूहळू राज्यातील रुग्णसंख्येत घट होत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. या संवादावेळी मुख्यमंत्री कोरोनामुक्त गावाची संकल्पना मांडत राज्यातील ३ सरपंचांचे कौतुक केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या वाढतेय, प्रत्येक गावानं कोरोनामुक्त व्हायचं ठरवलं तर ही लाट थोपवू शकता. माझं कुटुंब माझी जबाबदारी, मी जबाबदार अशा मोहिमा राबवल्या त्याला चांगलं यश मिळालं. प्रत्येकानं ठरवलं मी माझं गाव कोरोनामुक्त करायचं तर नक्कीच करू शकतो. सगळ्यांनी ठरवलं माझं घर कोरोनामुक्त, वस्ती कोरोनामुक्त, गाव कोरोनामुक्त, तालुका कोरोनामुक्त सगळं राज्य कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही. हिवरेबाजारचे पोपटराव पवार, घाटणे गावचा सरपंच ऋतुराज देशमुख, कोमल करपे यांनी त्यांची गावं कोरोनामुक्त केली. या तरूण मुलांच्या कामाचं कौतुक आहे. मी लवकरच तिघांशी बोलणार आहे. मी जसं तुमच्याशी बोलतोय तसं या तिघांनाही तुमच्याशी बोलायला सांगणार आहे. कोरोनामुक्त गाव ही संकल्पना आपल्याला राबवायची आहे. महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो. गाव कोरोनामुक्त झाल्यावर राज्य कोरोनामुक्त होईल, महाराष्ट्राचा आदर्श देशाने घेतला तर देश कोरोनामुक्त होईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
कोण आहे ऋतुराज देशमुख?
सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामधील घाटणे गाव कोरोनामुक्त करण्यात गावचे सरपंच यशस्वी ठरलेत. गावचा सर्वात युवा सरपंच म्हणून निवडून आलेला हा ऋतुराज देशमुख नावाचा तरुण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करताना सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश ऋतुराजला नेहमीच मिळाला. सरपंच म्हणून जबाबदारी सांभाळताना त्याने गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामस्थांना सोबत घेऊन 'बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह' ही मोहीम हाती घेतली. ऋतुराजच्या या मोहिमेला ग्रामस्थांचा देखील चांगला प्रतिसाद लाभला आणि गाव कोरोनामुक्त करण्यात यश आले.
'बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह'
देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातले असताना सर्वत्र काहीसे नकारात्मक वातावरण आहे. अशा परिस्थितीत सकारात्मकतेचा संदेश देणारी एक घटना समोर आली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरवातीला गावातील कोरोनाचे रुग्णांचे प्रमाण वाढू लागले. गावात कोरोनाचे दोन मृत्यू झाल्यानंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यानंतर गावाला कोरोनामुक्त करण्यासाठी ऋतुराजने रुग्णांचा शोध, तपासणी, उपचार, लसीकरण, नियमांचे काटेकोरपणे पालन या पंचसूत्रीचा वापर केला. गावातील जे ग्रामस्थ शहरात जातात किंवा जनसंपर्क अधिक असलेले व्यवसाय करतात अशा ग्रामस्थांसाठी आवश्यकतेनुसार रॅपिड अॅन्टिजेन टेस्टिंग सुरू करण्यात आले. तसेच गावातील ४५ वर्षांवरील ग्रामस्थांचे लसीकरण करून घेणे, आशा वर्कर्सच्या मदतीने वेळोवेळी गावकऱ्यांची ऑक्सिजन लेव्हल, तापमान तपासून घेणे, गावातील प्रत्येक कुटुंबाला व्हिटॅमिनच्या गोळ्या, सॅनिटायझर, मास्क, साबण यांचा समावेश असेलेले 'कोरोना सेफ्टी कीट' देणे अशा विविध उपाययोजनांवर भर देण्यात आला. गावात विलिगीकरण कक्ष आणि मिनी कोविड सेंटर सुरू करून सर्व आवश्यक गोष्टींच्या उपलब्धतेबाबत ऋतुराजने विशेष लक्ष पुरविले.
पाहा व्हिडीओ -