मुंबई : येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासंदर्भात एक नियमावली राज्य शासनाने सोमवारी जारी केली. कोरोना लॉकडाऊनचा फटका स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांनादेखील बसणार आहे. शाळा व महाविद्यालये बंद असल्याने केवळ संबंधित संस्था व व्यक्तींच्या पुढाकाराने कमी माणसांच्या उपस्थितीतच कार्यक्रम घ्यावा, असे सांगण्यात आले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे १५ ऑगस्टला सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी मंत्रालयात ध्वजारोहण करतील. शारिरिक अंतर ठेवून स्वातंत्र्यदिन साजरा करावा, सोशल मीडियाद्वारे आत्मनिर्भर भारत घोषणेचा प्रसार करावा, घरातील गच्चीवर वा बाल्कनीत जाऊन तिरंगा ध्वज फडकवावा, असे सांगण्यात आले आहे. सोशल मीडिया, डिजिटल मीडियातून ध्वजरोहण करावे असे आवाहनही शासनाने केले आहे.गावांमध्ये प्रशासकांच्या हस्ते ध्वजारोहणराज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी संबंधीत गावांमध्ये प्रशासकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. पण एकापेक्षा अधिक गावांचा कार्यभार असलेल्या प्रशासकांच्या बाबतीत त्यांनी येत्या स्वातंत्र्यदिनी एका गावात ध्वजारोहण करावे, इतर गावात स्वातंत्र्यसैनिक किंवा तंटामुक्ती समिती अध्यक्ष किंवा ग्रामसेवक किंवा गटविकास अधिकारी यांनी नेमलेले सक्षम अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करावे, असे जिल्हा परिषदांना सूचीत केल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
CoronaVirus News: स्वातंत्रदिन कार्यक्रमांनाही बसणार कोरोनाचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 9:34 AM