मुंबई: कोरोनामुळे बाजरापेठा बंद झालेल्या आहेत. कंपन्यांचे कामही थांबलेले आहे. अनेक कंपन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींयच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोणाचा पगार कापणार नाही याची शाश्वती दिलेली आहे. असे असताना नोकरदार वर्गामध्ये एक मोठा भीती आहे. समजा पगार झाला नाही, किंवा रोजगार गेला तर घर, वाहन, घरातील वस्तूंचे हप्ते कसे फेडायचे? घरखर्च कसा चालवायचा? यामुळे त्यांचे EMI, इन्स्टॉलमेंट तात्पुरते थांबविण्याची मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.
रिझर्व्ह बँकेने अशा प्रकारचे बँकांचे हप्ते वसुली थांबवावे आणि कोरोनामुळे त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा द्यावा. केंद्र सरकारने असे आदेश रिझर्व्ह बँकेला द्यावेत, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. कर्जाचे हप्ते, कॅश क्रेडिटचे व्याज, क्रेडिट कार्डांची बिले आदींचे हप्ते तात्पुरते थांबवावेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी तसे पत्र पाठवून केंद्राला शिफारस करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
य़ाचबरोबर अशोक चव्हाणांनी राज्यातील नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व खासगी आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवा म्हणून बँका भलेही सुरु असतील. पण उद्योग-व्यवसाय सारे ठप्प असल्याने पैशांची देवाणघेवाण थांबली आहे. याचा सामाजिक हिताचा विचार करून हा निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. एकजरी कर्जाचा हप्ता चुकला तरीही त्याचा थेट परिणाम त्या व्यक्तीच्या सिबिल स्कोअरवर होतो. यामुळे त्याला पुन्हा गरजेला कर्ज मिळणार नाही. या अडचणीचा प्रामुख्याने विचार करावा अशी विनंतही त्यांनी केली आहे. याचबरोबर जीएसटी, आयकर भरण्याची मुदतही वाढवावी अशी विनंती केली आहे.