मुंबई: लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केला जाणार असल्याची चर्चा आज दिवसभर सुरू होती. मात्र अशा प्रकारे कोणतीही कपात केली जाणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. आज सकाळपासून अनेकांचे फोन आले. कित्येकांनी काळजी व्यक्ती केली. मात्र सरकार कोणाचंही वेतन कापणार नाही. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन आलेल्या आर्थिक अडचणी पाहता लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्यात पगार दिला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यातल्या जनतेशी संवाद साधला.कोरोनाचं संकट असतानाही शासकीय कर्मचारी सेवा देत आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचं काम सुरू आहे. वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र राबत आहेत. पोलीस आपल्या संरक्षणासाठी कार्यरत आहेत. जनतेच्या सेवेसाठी अखंडपणे कार्यरत असलेल्या मंडळींचा पगार कापण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता तो टप्प्याटप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.आपण कोरोनाविरुद्धच्या लढाईत अखेरच्या आणि निर्णायक टप्प्याकडे जात आहोत. त्यामुळे वस्त्या, इमारती सील कराव्या लागत आहेत. एखाद्या भागातला संसर्ग दुसरीकडे पोहोचू नये यासाठी ही काळजी घेतली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सुरुवातीला केंद्र सरकारनं काही देशांचा समावेश कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत केला नव्हता. त्यामुळे अशा देशांमधून आलेल्या व्यक्तींची विमानतळांवर तपासणी होऊ शकली नाही. परदेशातून आलेल्या, मात्र तपासणी न झालेल्या अशा व्यक्तींनी पुढे यावं, स्वत:ची माहिती द्यावी आणि तपासणी करून घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याचदा सर्दी, खोकल्याचा त्रास होतो. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. एखाद्या व्यक्तीला अॅलर्जी असल्यास, त्यांनी विशेष काळजी घ्यावी. उष्णता वाढल्यावर एसी लावू नये. त्याऐवजी खिडक्या उघडाव्यात. कोरोनाचा विषाणू थंड वातावरणात जास्त काळ टिकतो. त्यामुळे कृपया एसी लावू नका. थंड पाणी, पेय पिऊ नका, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोरोनाच्या भीतीनं अनेक खासगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद ठेवले आहे. मात्र त्यांची सध्याच्या घडीला नितांत गरज आहे. शासकीय वैद्यकीय कर्मचारी जीवावर उदार होऊन काम करत आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू करावेत आणि त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आल्यास त्यांना शासकीय रुग्णालयांमध्ये पाठवावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांची पुन्हा एकदा केलं.
CoronaVirus: कोणाचंही वेतन कापणार नाही; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पगाराचं 'गणित'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 8:34 PM