मुंबई - राज्यात लॉकडाऊनला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आता धान्याच्या ऐवजी थेट पीठ नागरिकांना कसे मिळेल याबाबतीतही ही सूक्ष्म नियोजन सुरू आहे. तसेच यावर्षीचे रेडीरेकनर दर 31 मार्चला जाहीर होणार नाहीत, अशी महत्त्वपूर्ण घोषणा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात याांनी केली.
थोरात म्हणाले की, ''पूर्ण लॉकडाउनला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जीवनावश्यक वस्तू वेळेत आणि पुरेशा प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचतील यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. धान्याच्या ऐवजी थेट पीठ नागरिकांना कसे मिळेल याबाबतीतही ही सूक्ष्म नियोजन सुरू आहे.''
''राज्य सरकारकडून दर वर्षी मार्चअखेरीस रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कोरोणाच्या संकटातून जनतेला सावरण्यासाठी झटत आहेत. यावर्षीचे रेडीरेकनर दर 31 मार्चला जाहीर होणार नाही. कोरोणाच्या संकटातून महाराष्ट्र मुक्त झाल्यानंतर हे दर जाहीर केले जातील.''
''शेतीची कामे करण्यासाठी लॉकडाऊन मध्ये निर्बंध नाही. गव्हाची कापणी करण्यासाठी पंजाबहून जे हार्वेस्टिंग मशीन येथे आलेले आहेत, त्यांनाही पुरेशा इंधनाची उपलब्धता करून दिली जाईल, तशा सूचना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. पेट्रोल पंपांवर हार्वेस्टिंग मशिनरी ला इंधन दिले जाईल,'' अशी माहितीही त्यांनी दिली.
जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवू नये अशा आशयाच्या सूचना आम्ही प्रत्येक ठिकाणच्या जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांची ओळख व्हावी यासाठी पासेसची उपलब्धता करून ही वाहतूक सुरळीत केली जाते आहे, असेही त्यांनी सांगितले.