राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात मंगळवारी कोरोनाच्या 841 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15,525 वर पोहचली आहे. मात्र एकीकडे राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त झालेल्या सिंधुदुर्गात पुन्हा कोरोनाने शिरकाव केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्यात एक नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. या नव्याने सापडलेल्या रुग्णाचा आंबा वाहतुकीशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर रुग्ण हा २६ एप्रिल रोजी मुंबई येथे गेला होता तर दिनांक २७ एप्रिल रोजी मुंबईहून तो परतला होता. मुंबईमधील हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणाहून सदर रुग्ण आल्यामुळे त्याची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम आता सुरु करण्यात आले आहे.
भाजपाचे नेते नितेश राणे यांनी देखील ट्विट करुन नाराजी दर्शवली आहे. नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्गमध्ये करोना नाही पण प्रशाशनाच्या हलगर्जीमुळे अजून एक रुग्ण सापडला आहे. जिल्हा प्रशासनाने घरी सोडलेला व्यक्तीला कोरोना झाले असे समजते. तसेच आंबा वाहतुक करणाऱ्या ड्राईव्हरबद्दल सांगूनही लक्ष दिले नाही, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. ग्रीन झोनचे स्वप्न पाहणारा आमचा जिल्हा रेड झोनकडे वाटचाल करत असल्याचे देखील नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, देशात कोरोनाचे एकूण ४६४३३ रुग्ण झाले असून गेल्या २४ तासांतील आकडा चिंता वाढविणारा आहे. या काळात देशभरात ३९०० नवीन रुग्ण सापडले आहेत. तर १०२० रुग्ण बरे झाले आहेत. धक्कादायक म्हणजे मंगळवारी सर्वाधिक १९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बरे झालेल्या रुग्णांची सरासरी वाढली असून ती 27.41% झाली आहे.