जमीर काझी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून टॅक्सीचालकासह दोघांचे प्राण घेतलेल्या कॉर्पोरेट वकील जान्हवी गडकरविरुद्धच्या ‘ड्रंक अॅण्ड हिट’ खटल्याची सुनावणी लवकरच सत्र न्यायालयात सुरू होईल. त्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ रोहिणी सालियन काम पाहतील. त्यांचा नियुक्तीचा प्रस्ताव मंजुरीसाठी गृहविभागाकडे पाठविण्यात आल्याचे पोलीस आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले. पूर्व मुक्त मार्गावर दोन वर्षांपूर्वी घडलेल्या भीषण अपघाताबाबत जान्हवी विरुद्ध सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल आहे. येत्या १२ जूनला कोर्ट क्रमांक ३०मध्ये आरोप निश्चिती (चार्जफ्रेम), करण्यात येईल. कॉर्पोरेट क्षेत्रातील एक मोठा ‘ब्रॅण्ड’असलेल्या एका कंपनीत ३७ वर्षांची अॅड. जान्हवी अजित गडकर उच्च पदावर कार्यरत आहे. ९ जून २०१५ रोजी मध्यरात्री मित्रासमवेत पार्टी करून दारूच्या नशेत आॅडी चालवित चेंबूर येथील घरी परतत होती. १ वाजण्याच्या सुमारास पूर्व मुक्त मार्गावर एस ब्रीजजवळील बोगद्याच्या पुढील बाजूला विरुद्ध दिशेने गाडी चालवित समोरून येणाऱ्या टॅक्सीला उडविले होते. यात टॅक्सीचालक महंमद हुसेन अब्दुल सय्यद (५७), प्रवासी सलीम साबूवाला (५०), हे जागीच ठार झाले. तर अन्य चौघे प्रवासी गंभीर जखमी झाले होते. जान्हवीला वाचविण्यासाठी अनेक घटक प्रयत्नशील आहेत. त्यामुळे या खटल्यासाठी सरकार पक्षाकडून तज्ज्ञ वकिलाची नियुक्ती करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. त्यानुसार ज्येष्ठ वकील रोहिणी सालियन यांच्या नावाचा प्रस्ताव औपचारिक मंजुरीसाठी गृहविभागाकडे पाठविण्यात आला आहे.>जान्हवीविरुद्धचे कलममद्यधुंद अवस्थेतील जान्हवीला आरसीएफ पोलिसांनी अटक करून तिची वैद्यकीय तपासणी केली. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात ०.१९२ मद्याचे प्रमाण आढळले होते. त्यामुळे तिच्याविरुद्ध अपघातप्रकरणी भादंवि कलम ३०४ (२), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा १८३, १८४, १८५, ६६ (१) व मुंबई मद्य निषेध कायदा ८५ ही गंभीर कलमे लावण्यात आली आहेत.
कॉर्पोरेट वकील गडकरविरुद्धचा खटला सालियन चालविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2017 6:43 AM