जमीर काझी/ऑनलाइन लोकमतमुंबई,दि.7 - मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून टॅक्सी चालकासह दोघाचे प्राण घेतलेल्या कॉर्पोरेट वकील जान्हवी गडकर हिच्याविरुद्धच्या ‘ड्रंक अॅण्ड हिट’ खटल्याची सुनावणी लवकरच सत्र न्यायालयात सुरु होणार आहे. त्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून जेष्ट विधीज्ञ रोहिणी सालीयन काम पहाणार आहेत. त्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव गृह विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याचे पोलीस आयुक्तालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
येथील पूर्व मुक्त मार्गावर दोन वर्षापूर्वी घडलेल्या या भीषण अपघाताबाबत जान्हवी हिच्या विरुद्ध सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल असून येत्या १२ जूनला कोर्ट क्रमांक ३० मध्ये आरोप निश्चिती करण्यात येणार आहे.आरोपनिश्चिती (चार्जफ्रेम) करण्यात येणार आहे. गडकर हिच्या आॅडी कारने टॅक्सीला ठोकर दिल्याने चालकासह एक प्रवासी जागीच ठार झाला होता. तर चौघे गंभीर जखमी झाले होते. उच्चभ्रू व ‘पेज थ्री कल्चर’ च्या तरुणीकडून झालेले कृत्य राज्यासह देशभरात चर्चेचा विषय बनले होते. या खटल्याकडे सगळ्याचे लक्ष लागून असल्याने या प्रकरणी विशेष सरकारी वकीलाची नेमणूक करण्याचा निर्णय घेतल्याचे वरिष्ट अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
कॉपोरेट क्षेत्रातील एक मोठा ‘ब्रॅण्ड’असलेल्या एका कंपनीत ३७ वर्षाची अॅड. जान्हवी अजित गडकर ही उच्च पदावर कार्यरत आहे. ९ जून २०१५ रोजी मध्यरात्री मित्रासमवेत पार्टी करुन दारुच्या नशेत आॅडी(क्रं.एम.एच.०३-बीएस- ४७४१) चालवित चेंबूर येथील घरी परतत होती. एक वाजण्याच्या सुमारास पूर्व मुक्त मार्गावर आर.एन.पार्क एस ब्रीजजवळील बोगद्याच्या पुढील बाजूला विरुद्ध दिशेने गाडी चालवित समोरुन येत असलेल्या टॅक्सीला (एमएच.०८-व्हीटी-१७८५) उडविले होते. त्यामध्ये टॅक्सीचालक महंमद हुसेन अब्दुल सय्यद (५७), प्रवासी सलीम साबूवाला (५०) जागीच ठार झाले. तर अन्य चौघे प्रवासी गंभीर जखमी झाले होते. मद्यधुंद अवस्थेतील जान्हवीला आर.सी.एफ. पोलिसांनी त्याचवेळी अटक करुन वैद्यकीय तपासणी केली. फौरेन्सिक लॅबच्या ०.१९२ मद्याचे प्रमाण आढळले होते.
उच्चभू्र वर्गातील या तरुणीचे हे बिभत्स कृत्य कॉपोरेट क्षेत्रासह सर्वत्र चर्चेचा विषय बनले होते. तिला या प्रकरणातून वाचविण्यासाठी तिचे अनेक जेष्ट वकील व तिचे सहकारी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे या खटल्यासाठी सरकार पक्षाकडून तज्ञ वकीलाची नियुक्ती करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. त्यानुसार जेष्ट वकील रोहिणी सालियन यांच्या नावाचा प्रस्ताव त्यासाठी बनविण्यात आला आहे.आयुक्तालयाकडून गृह विभागात पाठविण्यात आला असून विधी व न्याय विभागाकडून औपचारिक मंजुरी मिळविली जाईल, असे सांगण्यात आले. जान्हवी विरुद्धचे कलम-जान्हवी गडकर हिने त्या रात्री चर्चेगेटजवळील हॉटेल मरीन प्लाझा चर्चगेट व आयरिश क्लब येथे मित्रासमवेत मद्यप्राशन केल्याचे तपासातून स्पष्ट झाले होते. त्यामुळे तिच्याविरुद्ध अपघाताप्रकरणी भादवि कलम ३०४(२), २७९,३३७,३३८,,४२७ सह मोटार वाहन कायदा १८३, १८४,,१८५ ६६ (१),व मुंबई मद्य निषेध कायदा ८५ या गंभीर कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.प्रत्येक सुनावणीसाठी २० हजार फी-सत्र न्यायालयात चालणाऱ्या या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून काम पहाण्यासाठी अॅड. रोहिणी सालीयन यांना प्रत्येक दिवसाची सुनावणीसाठी २० हजार रुपये फी असणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक तासासाठी ५ हजार रुपये कॉन्फरन्स व ड्राफ्टीग शुल्क दिले जाणार आहे.कोण आहेत रोहिणी सालीयन-अॅड. रोहिणी सालीयन या फौजदारी खटल्यातील जेष्ट विधीतज्ञ असून गेल्या ३५ वर्षाहून अधिक वर्षांचा त्यांना अनुभव आहे. २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट , ठाण्यातील गडकरी रंगायतन मधील बॉम्बस्फोट खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे. साध्वी प्रज्ञासिंग विरुद्धच्या खटल्यात अधिक तीव्रपणे बाजू न मांडण्याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांकडून दबाव आणण्यात आला होता, असे प्रतिज्ञापत्र सवौच्च न्यायालयात सादर करण्याचा निडरपणा त्यांनी दाखविला होता.