मुंबई : समाजातील तळागाळातील व्यक्तींची जोपर्यंत सामाजिक व आर्थिक प्रगती होणार नाही तोपर्यंत देशाची आर्थिक प्रगती होणार नाही. ही बाब लक्षात घेऊनच केंद्र शासन व राज्य शासन अनुसुचित जाती व जमातीच्या उदयोजकांसाठी विशेष योजना राबवित असून त्यात कॉर्पोरेट सेक्टरमधील उद्योजकांनी आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले.दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीज (डिक्की), केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वर्षानिमित्त गोरेगांव येथील बॉम्बे कन्वेनशन अँड एक्झिबिशन सेंटरमध्ये पाचवे नॅशनल ट्रेड अॅन्ड एक्स्पो २०१६ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत, केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री कुलराज मिश्रा, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, राज्याचे शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी प्रास्ताविक भाषणात भारतामध्ये सव्वा लाख उद्योजक बनविण्याचा संकल्प केंद्र शासनाने केला असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)कलराज मिश्रा यांनी आपल्या भाषणात केंद्र शासनातर्फे अनुसूचित जाती व जमातींसाठी देण्यात येणाऱ्या विविध सवलतींचा आढावा घेतला. गेहलोत यांनी समाजातील मागसवर्गीय महिला सक्षम व्हाव्यात यासाठी केंद्र शासन विविध योजना राबवित असल्याचे सांगितले. सार्वजनिक उपक्रमांतर्गत येणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील बँकेच्या शाखेतून दोन उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी विशेष आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे.
‘कॉर्पोरेट सेक्टरचे सहकार्य आवश्यक’
By admin | Published: March 26, 2016 1:49 AM