लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नैसर्गिक आपत्तींसोबतच रासायनिक आणि औद्योगिक आपत्तींना प्रतिबंध करणे किंवा अशा दुर्घटना घडल्यास त्यांना योग्य पद्धतीने सामारे जाण्यासाठी कार्पोरेट सहभाग घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. रासायनिक आणि औद्योगिक आपत्ती व्यवस्थापन (सीआयडीएम) या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र आणि गुजरात सरकारसह विविध सरकारी यंत्रणांच्या संयुक्त विद्यमाने सीआयडीएम परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, रासायनिक, औद्योगिक आपत्ती व्यवस्थापनासाठी शासन सदैव सज्ज आहेच, परंतु उद्योग, रासायनिक कंपन्या, संस्था आणि व्यक्तिगत स्तरावर सदैव सज्ज राहण्याची आवश्यकता अधिक आहे. आपत्ती व्यवस्थापनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी सामूहीक प्रयत्नांची गरज आहे. राज्यात मुख्यत्वे रासायनिक प्रक्रिया, उत्पादन, साठवण, वाहतूक आणि विषारी कच-याच्या विल्हेवाटीदरम्यान औद्योगिक दुर्घटना होतात. अनेक गोदामे हे निवासी आणि औद्योगिक वसाहतींच्या जवळपास आहेत त्यामुळे या भागांचा धोका वाढतो, असे पाटील म्हणाले.उद्योगमंत्री देसाई म्हणाले की, ‘१९८४ मधील भोपाळ दुर्घटनेनंतर अनेक उपाययोजना राबविल्या गेल्या. त्यानंतर मोठ्या रासायनिक व औद्योगिक दुर्घटना कमी झाल्या. मात्र दुर्घटना थांबलेल्या नाहीत. गेल्या वर्षी डोंबिवलीत झालेल्या जीवितहानीमुळे ही बाब समोर आली.’सर्वोत्तम कार्यप्रणालीवर भरया परिषदेसाठी देशातील वीस राज्यातील चारशे हून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. परिषदेत, विश्वस्तरावरील औद्योगिक सुरक्षा पद्धतीवर भर देणे, औद्योगिक अपघातांना तातडीने प्रतिसाद, सुरक्षेमध्ये उत्कृष्ट पद्धती राबविलेल्या कंपन्यांची यशोगाथा, घातक/विषारी द्रव्ये, पेट्रोलियम उत्पादने आणि गॅस आदींच्या वाहतुकीवेळी अपघात कमी करण्यासाठी सर्वोत्तम कार्यप्रणाली आणि तंत्रज्ञान निर्मिती आदी बाबींवर भर दिला जाईल.
आपत्ती व्यवस्थापनात घेणार कार्पोरेट मदत - चंद्रकांत पाटील
By admin | Published: June 01, 2017 3:04 AM