पिंपरी : पुण्यातील बाणेर येथील गृहप्रकल्पाचा स्लॅब पडण्याची घटना घडल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने बांधकाम व्यावसायिकांकडून होणाऱ्या अनधिकृत बांधकामाचे सर्वेक्षण सुरू केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने ही कारवाई सुरू केली आहे. विनापरवाना बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना नोटीस देण्याचे काम सुरू केले आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.पुण्यातील बाणेर येथील गृहप्रकल्पाचा स्लॅब पडून झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पुणे महापालिकेने अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकांचे सर्वेक्षण सुरू केले होते. तसेच खासदार श्रीरंग बारणे यांनी पुण्यातील दुर्घटनेस कारणीभूत असणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांच्या वाकड आणि चऱ्होलीतील बांधकामांची चौकशी करा, अशी मागणी केली होती, याची दखल आयुक्तांनी घेतली आहे. (प्रतिनिधी)>या विषयी आयुक्त वाघमारे म्हणाले, ‘‘बांधकाम व्यावसायिक पहिल्या टप्प्यात बांधकाम परवानगी घेताना काही मजल्यांची घेतात. मात्र, पुढे टीडीआर लोड करून आणखी मजले उभारण्याचे नियोजन करतात. मात्र, याची परवानगी न घेताच बांधकाम सुरू करतात. बांधकाम पूर्ण करून नंतर परवानगी घेण्यासाठी अर्ज करतात. अशी मानसिकता वाढली आहे. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणी सुरू असणाऱ्या बांधकाम प्रकल्पांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यानुसार विनापरवाना मजले उभारणाऱ्यांना नोटीस देण्याचे काम सुरू केले आहे. प्राइड पर्पलसंदर्भात खासदारांनी केलेल्या तक्रारींची दखल घेतली आहे. संबंधित कामांची तपासणी करण्यासाठी बांधकाम परवाना विभागातील अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली आहे. तिचा अहवाल येताच चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.’’
बिल्डरांना दिली पालिकेने नोटीस
By admin | Published: August 04, 2016 1:13 AM