पुणे : महापालिकेच्या वतीने वडगावशेरी येथील कमी पाणीपुरवठा होणाऱ्या भागाला तीन महिन्यांना दहा लाख रूपये खर्च करून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. वडगावशेरीमधील एका टँकर व्यावसायिकाने पालिकेला ही सेवा मोफत पुरविण्याची हमी दिली. त्यानुसार पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने त्याला रीतसर मान्यताही दिली. त्याने १ जूनपासून मोफत सेवा देण्यास सुरुवात केल्यानंतर अचानक ५ व्या दिवशी त्याला कोणतेही कारण न देता त्याची सेवा बंद करण्यास सांगण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे.वडगावशेरी येथील जलकेंद्रातून रोज ३० ते ४० टँकर पालिकेच्या वतीने नागरिकांना दिले जातात. यासाठी ३ महिन्यांना १० लाख रुपयांचा खर्च पालिकेला येतो. टँकर व्यावसायिक ललित गलांडे यांनी महापालिकेला लागणारे ३० ते ४० टँकर मोफत पुरविण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार ३० मे २०१६ रोजी १०० रुपयांच्या स्टँपपेपरवर पालिकेला वडगावशेरी भागासाठी दररोज लागणाऱ्या टँकरच्या ३० ते ४० खेपा मोफत पुरविण्याचे हमीपत्र दिले. त्याबदल्यात पैसे भरून दिवसाला ३० ते ४० खेपा त्यांना त्याच्या वापरासाठी मिळाव्यात, अशी विनंती त्यांनी केली होती. पाणीपुरवठा विभागप्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांच्याशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
मोफत टँकर सेवेला पालिकेचाच नकार
By admin | Published: June 10, 2016 12:56 AM