लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांंच्या गाडीवरील लाल दिवा हटविण्याचा निर्णय घेतला म्हणून लगेच व्हीआयपी संस्कृती बंद होईल असे नाही. पालिका रुग्णालयांमध्ये महापौर, नगरसेवकांना उपचारांसाठी अग्रक्रम द्यावा, त्यांना चांगली सेवा द्यावी, अशा आशयाचे निर्देश केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता व पालिका रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी पालिका रुग्णालयातील डॉक्टरांना दिले आहेत. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. पालिका रुग्णालयांना २९ एप्रिल रोजी पाठविलेल्या परिपत्रकात अविनाश सुपे यांनी लोकप्रतिनिधींना अग्रक्रम द्या, असे आदेश दिले. आमदार, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, त्यांच्यासोबत असणाऱ्या रुग्णांवर प्र्राधान्याने उपचार करा. सर्वच रुग्णांशी व्यवस्थित बोला. गैरसमज टाळा, अशा सूचनाच दिल्या आहेत. परिपत्रकात महापौरांसह चाळीस नगरसेवकांची मोबाइल क्रमांकासह नावे दिली आहेत. यात महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पालिका आयुक्त अजय मेहता, सभागृह नेते यशवंत जाधव, भाजपा गटनेते मनोज कोटक, राष्ट्रवादी गटनेते राहुल जाधव, विशाखा राऊत, तुळशीराम शिंदे, रोहिणी कांबळे, सान्वी तांडेल, सुभाष वाडकर, सिंधू मसूरकर यांच्यासह अन्य नगरसेवकांची नावे आहेत. पालिका रुग्णालयात चांगली वागणूक मिळत नाही. कर्मचारी दखल घेत नाहीत, अशा अनेक तक्रारी वारंवार नगरसेवकांनी केल्या आहेत. त्यामुळेच हे परिपत्रक काढल्याचे संगण्यात येते. उपचारांसाठी प्राधान्य देण्याची पद्धत पूर्वीपासून आहे. नवीन कोणतीच पद्धत सुरू केलेली नाही. लोकप्रतिनिधींशी सुसंवाद साधत चांगले उपचार देण्याबाबतच निर्देश दिल्याचा दावा सुपे यांनी केला आहे.
पालिका रुग्णालयात नगरसेवकांना प्राधान्य
By admin | Published: May 10, 2017 2:54 AM