अकोला, दि. २१- भरघोस उत्पादनासाठी मातीचे आरोग्य सुदृढ असणे गरजेचे आहे. मातीचे आरोग्य सुधारणे व कमी पाण्यात अधिक उत्पादन येण्यासाठीच्या संशोधनावर सक्षमतेने भर दिला असून, एकात्मिक शेती पद्धती व शिफारशी केलेल्या तंत्रज्ञान, संशोधनाची प्रत्यक्ष शेतावर अंमलबजावणी आवश्यक असल्याचे प्रतिपादन शनिवारी (आयसीएआर)भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहायक महासंचालक डॉ. एस. भास्कर, दिल्ली यांनी केले.अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तसेच हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेच्यावतीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत १७ राज्यातील १४0 कृषी शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला. २१ जानेवारीला कार्यशाळेचा समारोप झाला. या कार्यक्रमाला डॉ.एस.भास्कर, हैदराबाद येथील डॉ.के.पी.आर. विठ्ठल, डॉ.सुब्बाराव, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. व्ही. एम. मायंदे, आंध्रप्रदेश, प्रकल्प समन्वयक डॉ. रवींद्र चारी, कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ तथा कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एम.बी. नागदेवे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.भास्कर यांनी मातीच्या सुधारणेसह एकात्मिक शेती पद्धतीवर अधिक लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन केले. शेतकर्यांनी कुक्कुट, शेळीपालन, दुग्ध व्यवसायाची शेतीला जोड द्यावी लागणार आहे. पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापनही काटेकोर करावे लागणार असून, पाणी अडवून जिरवणे तेवढेच महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.डॉ. नागदेवे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्या माध्यमातून राबविण्यात योणार्या विविध कामांची माहिती दिली. विदर्भातील कोरडवाहू क्षेत्र आणि पावसाचे कमी झालेले दिवस बघता, शेतकर्यांनी पाण्याचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले. पाच दिवस कोरडवाहू शेती आरोग्य सुधारणा कार्यक्रमावर अधिक भर देण्याचे ठरविण्यात आले. कोरडवाहू शेतीला कसे शाश्वत करता येईल, कमी पाण्यात, खर्चात भरघोस पीक कसे घेता येईल,आदी विषयांवर कोरडवाहू या विषयाच्या कृषी शास्त्रज्ञांनी सूक्ष्म मंथन केले. भारतातील ४५ टक्के शेती कोरडवाहू असून, ५0 टक्के लोकसंख्या ही कोरडवाहू शेतीवर अवलंबून आहे. कोरडवाहू शेतीसमोर अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांना सामोरे जात उत्पन्न कसे वाढविता येईल, यासाठी शास्त्रज्ञांद्वारे निर्मित तंत्रज्ञान कोरडवाहू शेती शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विस्तार कार्यावर अधिक भर देताना त्यासाठीचे अनेक विषय शास्त्रज्ञांनी हाताळले. अनेक शिफारशी तयार करण्यात आल्या. समारोपाला कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कर्मचार्यांची उपस्थिती होती.
कोरडवाहू शेतीचे आरोग्य सुधारणार!
By admin | Published: January 22, 2017 3:04 AM