विलास गावंडे ल्ल यवतमाळराज्य परिवहन महामंडळाच्या तोट्यास वाहकच जबाबदार असल्याचा निष्कर्ष महामंडळाने काढला आहे. बडतर्फी, वेतनवाढ रोखणे-कपात करणे या उपाययोजनांनंतरही परिणाम होत नसल्याने आता अपहार करणाऱ्या वाहकांवर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक वाहकाला या निर्णयाची प्रत पाठविली आहे. बुधवारपासून याची अंमलबजावणी होणार आहे.महामंडळाला २०१४-१५ या आर्थिक वर्षात ६४५ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. मागील काही वर्षांचा संचित तोटा १ हजार ८३९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. वाहकांनी केलेला अपहार हे यामागील प्रमुख कारण असल्याच्या निष्कर्षाप्रत महामंडळ पोहोचले आहे. एखाद्या वाहकाने केलेल्या अपहाराची रक्कम कमी असली तरी वाहकांची एकूण संख्या लक्षात घेता आणि होणारा अपहार पाहता तोट्यात मोठी भर पडली आहे. महामंडळांतर्गत होणारी कारवाई क्षुल्लक वाटत असल्याने या कारवाईला वाहक जुमानत नाहीत. म्हणूनच आता अपहार करणाऱ्या वाहकांविरुद्ध थेट पोलिसांत तक्रार केली जाणार आहे. मार्ग तपासणी पथकाला ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. यासाठी सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांना उद्दिष्ट दिले जाणार आहे. प्रत्येक मार्ग तपासणी पथकाने बस व मार्ग तपासणी करताना वाहकाला त्याची बाजू मांडण्याची संधी द्यावी, असे निर्देश आहेत. असे आहेत अपहाराचे मार्ग...प्रवाशांकडून भाडे वसूल केले, मात्र तिकीट दिले नाही, तिकिटांची पुनर्विक्री, कमी दराचे तिकीट देणे, अनियमित तिकीट देणे, लगेजमधील अनियमितता आदी मार्गांनी एसटी वाहकांकडृून गैरव्यवहार केला जातो. एकापेक्षा अधिकवेळा अपहार करताना आढळलेल्या वाहकांवर पोलीस कारवाई केली जाणार आहे.एप्रिल २०११ ते मार्च २०१५या चार आर्थिक वर्षांत अपहाराची54,311 प्रकरणे उघडकीस आली असून, ती निकालीही काढण्यात आली.प्रकरणांमध्ये काही वाहकांची वेतनवाढ रोखली तर काहींचे वेतन कमी केले.