मुंबई : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या काळात राज्याच्या उद्योग विभागात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करीत देसाई यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी आणि संपूर्ण प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी करावी, अशी जोरदार मागणी करीत विरोधी पक्ष सदस्यांनी विधिमंडळाची दोन्ही सभागृहे दणाणून सोडली.जमीन अधिसूचित करायची व पैशांचा व्यवहार करून ती पुन्हा सोयीस्करपणे वगळून टाकायची, असा प्रकार उद्योग विभागात होत असल्याचा आरोप विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. उदाहरण देताना ते म्हणाले की, नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मौजे गोंदे (दुमाला) येथील अधिसूचित जमिनीपैकी ३० हेक्टर जमीन वगळण्याबाबत स्वस्तिक प्रॉपर्टी, मुंबई यांनी उद्योग विभागाला विनंती केली आणि त्यानुसार निर्णय घेण्यात आला.विद्यमान उद्योगमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा भूसंपादनास विरोध असल्याचे कारण सांगून स्वस्तिक प्रॉपर्टी, मुंबई या फर्मला सोडली. ही फर्म मुंबईत बांधकाम करणारी कंपनी आहे. त्यांचे अनेक गृहनिर्माण प्रकल्प आहेत. त्यामुळे ही कंपनी शेतकरी कशी असू शकते, असा सवाल करीत विखे पाटील संबंधित पुरावे दाखवले. या जमिनी बिल्डरांच्या घशात घालून उद्योग विभागाने मेक इन महाराष्ट्राला फेक इन महाराष्ट्र करण्याचे काम केले आहे. या प्रकरणी ईडीमार्फत चौकशी अन् देसार्इंच्या राजीनाम्याची त्यांनी मागणी केली.विधान परिषदेतही गोंधळविधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उद्योग विभागाचा अन्य एक घोटाळा बाहेर काढला. नाशिकजवळील वाडिव्हरे येथील ६०० एकर जमीन नहार ग्रुपला मोकळी करून दिल्याचा नवा आरोप करत सुभाष देसाई यांचा राजीनामा घेऊन एसआयटी चौकशीची मागणी केली.देसाई यांनी विरोधी पक्षनेत्यांनी केलेले आरोप फेटाळून लावत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला; पण विरोधकांनी त्यांना बोलू दिले नाही. यामुळे उडालेल्या गोंधळामुळे सभापती रामराजे निंबाळकर यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.नियमबाह्य काहीच केले नाही : देसाईनाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मौजे गोंदे (दुमाला) येथे एमआयडीसीसाठी अधिसूचित जमीन मोकळी करण्याचा निर्णय तेथील शेतकºयांच्या मागणीनुसार आणि एमआयडीसीने दिलेल्या प्रस्तावाच्या आधारेच घेण्यात आला. विशिष्ट व्यक्तींना लाभ पोहोचविण्याचा हेतू कधीही नव्हता, असा खुलासा शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानसभेत केला.शिवसेनेचे सदस्य झाले आक्रमकराष्ट्रवादीचे अजित पवार यांनीही देसार्इंच्या निर्णयावर टीका करीत भ्रष्टाचाराचे आरोप केले. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी तर या सर्व व्यवहाराची फाइलच सभागृहात दाखविली. त्यातील एकेक मुद्द्यावर ते बोलू लागताच शिवसेनेचे सदस्य संतप्त होऊन पुढे आले आणि त्यांनी पाटील यांना रोखण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी असंसदीय शब्दांचा वापर विरोधकांबाबत केला.मेहता यांनाही केले लक्ष्यअध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी त्यांचे शब्द कामकाजातून काढले; पण पाटील यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी केली. त्यावर, पाटील यांनी बळेच दिलगिरी व्यक्त करतानाही विरोधकांची खिल्ली उडविली. विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याचीही जोरदार मागणी केली आणि नंतर देसाई यांना लक्ष्य केले.
सुभाष देसार्इंवर भ्रष्टाचाराचे आरोप : हकालपट्टीची मागणी : विरोधकांचा हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 5:32 AM