ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या भाऊगर्दीत काम अपूर्ण असतानादेखील घाईघाईने गावदेवी भाजी मंडईचा शुभारंभ केला होता. मंडईच्या बाहेर म्हणजेच गावदेवी मैदानात ठाण मांडून बसलेल्या १५४ भाजी व फळविक्रेत्यांना अखेर हक्काची जागा येथे दिली. आता येथील गाळे आणि ओटलेवाटपात भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे पालिकेने तयार केलेल्या अहवालातदेखील यात गैरव्यवहार झाल्याचे मान्य केले आहे. परंतु, त्यावर अद्याप संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई का झाली नाही, असा सवाल बुधवारी झालेल्या महासभेत सदस्यांनी प्रशासनाला विचारला. अखेर, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश महापौर संजय मोरे यांनी दिले. ठाणे रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर गावदेवी मैदानात ६० वर्षे जुनी मंडई आहे. येथील फेरीवाल्यांनी मैदान व्यापल्याने त्यांना २००३ मध्ये पर्यायी जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, बाजूलाच असलेल्या जागेवर मंडईचे काम सुरू झाले. त्यानंतर, ४ मार्च २०१४ रोजी या मंडईचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर, मागील ६० वर्षे मैदानात आपले बस्तान मांडून बसलेल्या भाजी आणि फळविक्रेत्यांना अखेर हक्काची जागा मिळाली. इमारतीच्या तळ मजल्यावर या भाजीविक्रेत्यांना स्थलांतरित केले आहे. लॉटरी पद्धतीने प्रत्येकाला गाळ्यांचे वाटप करण्यात आले. गाळेवाटपात आणि ओटले वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सदस्य मिलिंद पाटणकर आणि अशोक वैती यांनी केला. पाटणकर यांनी विचारलेल्या प्रश्नानुसार त्यांना हा अहवाल दिला आहे. या अहवालातही गाळे आणि ओटले वाटपात चुका झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. विशेष म्हणजे आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार या ओटल्यांचे वाटप अभियंता सुनील जाधव यांनी केले नसल्याचेही नमूद केले आहे. याशिवाय, अनेकांना पूर्वी असलेल्या जागेच्या क्षेत्रफळापेक्षा जास्त क्षेत्रफळ दिल्याचेही यात म्हटले आहे. पूर्वीपेक्षा तब्बल ३५ गाळेधारकांना अधिकच्या ओटल्यांची जागा दिली आहे. पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान करण्यास सुनील जाधव जबाबदार असून त्यांच्यावर कार्यवाही करणे अपेक्षित असल्याचेही नमूद केले आहे. >परंतु, या प्रकरणात केवळ जाधव हेच दोषी नसून शहर विभागातील खांडपेकर हेदेखील दोषी असल्याचा आरोप माजी महापौर अशोक वैती यांनी केला. त्यांच्याकडे शहर विकास आणि स्थावरचादेखील चार्ज असल्याने त्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. अखेर, महापौर तथा पीठासीन अधिकारी संजय मोरे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
मंडईच्या गाळेवाटपात भ्रष्टाचार
By admin | Published: July 22, 2016 2:36 AM