पुणे : कॉसमॉस बँकेच्या मुख्य सर्व्हरवर सायबर हल्ला करून ९४ कोटी रुपये लांबविल्याप्रकरणी औरंगाबाद आणि नांदेड येथून दोघांना सायबर क्राईम सेलच्या गुन्हे शाखाने अटक केली आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना १८ सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. के. खराडे यांनी दिले.
शेख मोहम्मत अब्दुल जब्बार (वय २८, रा. आयेशा मस्जिदजवळ) मिर्झा कॉलनी औरंगाबाद) आणि महेश साहेबराव राठोड (वय २२, रा. धावरीतांडा, नांदेड) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणात यापुर्वी फहिम मेहफूज शेख (वय २७, रा. नुरानी कॉम्पलेक्स, भिवंडी) आणि फहिम अझीम खान (वय ३०, रा. सिमा हॉस्पिटलच्या मागे, आझादनगर औरंगाबाद) यांना अटक करण्यात आली आहे. तर आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपींनी कट करून हा गुन्हा केला आहे. बँकेचे सर्व्हर हॅक होणार असल्याची माहिती मिळाल्याने वेगवेगळ््या भागातील आरोपी कोल्हापूर येथे आले होेते. त्यांनी पैसे काढण्यासाठी ९५ क्लोन एटीएम कार्डचा वापर केला आहे. जब्बार आणि रोठोड यांनी किती रक्कम काढली याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. तसेच यापुर्वी अटक आरोपींनी दिलेल्या माहितीवरून जब्बार आणि राठोड यांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी सुहास सुभाष गोखले (वय ५३, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून ९४ कोटी ४२ लाख रुपये लुटूल्याची घटना ११ ते १३ आॅगस्ट दरम्यान झाली होती. यातील अडीच कोटी रुपयांची रक्कम भारतातील विविध एटीएम केंद्रातून काढण्यात आली आहेत. यात ४१३ बनावट डेबिट कार्डच्या माध्यमातून २ हजार ८४९ व्यवहार करण्यात आले आहेत. तर, १२ हजार व्यवहार व्हिसा कार्डद्वारे झाले असून, त्यातून ७८ कोटी आणि स्विफ्ट व्यवहारातून १३ कोटी ९२ लाख रुपये बँकेतून गेले आहेत. मुंबई, इंदोर, कोल्हापूर या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपींची छायाचित्रे तयार करण्यात आली. मोबाईलची माहिती आणि आरोपींच्या फोटोंवरुन ते भिवंडी, औरंगाबाद, हैदराबाद, गोवा आणि विरार येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. या माहितीवरुन केलेल्या तपासात अटक केलेल्या आरोपींनी पाच साथीदारांच्या मदतीने काढल्याचे स्पष्ट झाले आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी ३ लाख ५५ हजार रुपये जप्त केले आहेत.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले आरोपी
आत्तापर्यत अटक करण्यात आलेले आरोपी तपासामध्ये मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले होते. त्यानंतर त्यांना राज्यातील विविध ठिकाणांहून अटक करण्यात आली आहेत. आरोपींनी बनावट कार्ड कोठे तयार केली, त्यांना त्याचे साहित्य कोणी पुरविले, आरोपींनी कॉसमॉस बँकेचा डाटा कसा मिळविला, बँकेचे सर्व्हर हॅक होणार याची माहिती कशी मिळाली, संबंधित गुन्हा आंतरराष्ट्रीय स्वरुपाचा असल्याने याचा शोध घेण्यासाठी १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सायबर क्राईम विभागाच्या गुन्हे शाखेने केली होती.