मेडिकल : ट्रामाच्या बांधकामात नियोजनाचा अभावनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) परिसरात असलेल्या वृक्षसंपदामुळे तळघरात नेहमीच पाणी शिरते. पावसाळ्यात तर गुडघाभर पाणी साचते. याचे ताजे उदाहण औषध भांडार आहे, असे असतानाही ट्रामा केअर सेंटरमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून तळघर बांधले. परंतु तिथेही हीच स्थिती निर्माण होण्याची शंका अनेकांनी उपस्थित केली आहे. यामुळे तळघरात रक्तपेढीऐवजी प्रसाधनगृह बांधण्याचा आणि ट्रामावर एक मजला वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रामाच्या बांधकामात नियोजन नसल्याचे हे आणखी एक उदाहरण समोर आले आहे, तर तळघरावर झालेल्या कोट्यवधीच्या खर्चावर आक्षेपही घेण्यात येत आहे. उपराजधानीत वाढती लोकसंख्या आणि वाहनांमुळे अपघातांची संख्याही वाढत आहे. रस्ते, रेल्वे अपघातातील जखमी प्रवाशांना ‘गोल्डन अवर’मध्ये वैद्यकीय सुविधा मिळाल्या तर त्यांचा जीव वाचू शकतो. हाच विचार करून मेडिकलमध्ये ट्रामा सेंटरला मंजुरी मिळाली. पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेंतर्गत ६ हजार ८८0 चौ.मी. जागेवर ट्रामा केअर सेंटरच्या बांधकामाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे, बांधकामाच्या सुरुवातीलाच बांधकामात नियोजन नसल्याची बाब खुद्द ट्रामा केअर सेंटरच्या बांधकाम सदस्यांनी उघडकीस आणली. या समितीने तब्बल २३ बदल सुचविले. यामुळे ट्रामा केअरच्या नकाशात बरेच बदल झाले. त्याला मंजुरी मिळण्यातही वेळ गेला. मंजुरीनंतर बांधकामाला सुरुवात झाली. वर्षे लोटली. ट्रामा सेंटर अजूनही तयारच होत आहे. १२ कोटी रुपये खचरून बांधण्यात येत असलेली ही वास्तू तळघरासह तीन मजल्याची नियोजित होती. पूर्वी या ट्रामा सेंटरमध्ये तळघरात रक्तपेढी, तळमजल्यावर स्वागतकक्ष, चिकित्सा विभाग, शस्त्रक्रिया कक्ष, सिटी स्कॅन, एमआरआय, डिजिटल एक्स-रे मशीन व पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र वॉर्ड, पहिल्या मजल्यावर दोन मोठे शस्त्रक्रिया कक्ष, अतिदक्षता विभाग व बाह्यरुग्ण विभाग तर दुसर्या मजल्यावर अतिदक्षता विभागासह पुरुष आणि महिलांचा वॉर्ड होणार होता. याशिवाय स्वागतकक्ष, प्रतीक्षालय, उपचार क्षेत्रात गंभीर आजाराच्या रुग्णांना त्वरित सेवा मिळण्यासाठी लाल, तांबडा आणि हिरव्या रंगाचे कक्ष आदींची सोय असणार होती. सध्याच्या स्थितीत ट्रामाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. येत्या दोन महिन्यात या इमारतीचा ताबाही बांधकाम विभाग मेडिकल प्रशासनाला देणार होते, परंतु पावसाळ्यात तळघरात पावसाचे पाणी साचण्याची शंका अनेकांनी उपस्थित केली. यातच झालेल्या चुकांवर पांघरुण घालण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेल्या तळमजल्यावर प्रसाधन गृह बांधण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या बांधकामात साधारण एक कोटीवर रुपये वाचल्याने या पैशातून ट्रामावर आणखी एक मजला बांधण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यात रक्तपेढी आणि प्रयोगशाळा असणार आहे. (प्रतिनिधी)
प्रसाधनगृहावर कोट्यवधीचा खर्च
By admin | Published: June 10, 2014 1:11 AM