ठाणे : महापालिकेने अपंग कल्याणकारी योजने अंतर्गत महापालिका हद्दीतील अपंगांसाठी १३ विविध प्रकारच्या योजनांसाठी साडेआठ कोटींची तरतूद केली आहे. परंतु, महिला बालकल्याण योजनेप्रमाणेच या योजनेतील एकही रुपया शहरातील एकाही अपंगाच्या हाती पडलेला नाही. असे असताना समाजविकास विभागाने या योजनेतून २४ लाख ८७ हजार ५५० रुपये खर्च केल्याचे दाखविले आहे. सॅटीसवर ८१ लाख खर्च करून अपंगांसाठी लिफ्ट बसविल्याचे समोर आले आहे. ठाणे महापालिकेने तयार केलेल्या नव्या योजने अंतर्गत गतिमंद विद्यार्थ्यांच्या पालकांना अर्थसाहाय्य करण्याबरोबर त्यांचे प्रशिक्षण, औषधोपचार, मोफत उपचार, पारितोषिके देणे, अधिकाऱ्यांचे मानधन, वैद्यकीय खर्च, विशेष शाळेत मोफत प्रवेश देणे आदींसह इतर महत्त्वाच्या बाबींचा समावेश करून यासाठी ३ कोटी ५६ लाख ५० हजारांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच शारीरिक अपंगांसाठीसुद्धा तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार, व्यवसायासाठी कर्जपुरवठा उपलब्ध करून देणे. यामध्ये १०० टक्के अपंग असलेल्या व्यक्तीस फायदा मिळणार आहे. यासाठी २५ लाखांची तरतूद, उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, वसतिगृह यासाठीसुद्धा २५ लाख. यामध्ये १०० लाभार्थी, व्यवसाय सुरू करण्यासाठी, तांत्रिक व्यवस्थापनासाठी ९०० लाभार्थी अपेक्षित धरून यासाठी ४५ लाख, कृत्रिम अवयव, तीनचाकी व्हीलचेअर, टेपरेकॉर्डर यासाठी ५०० लाभार्थी अपेक्षित धरून यामध्ये ३० लाखांची तरतूद, योजना पुस्तिका, कार्यालय यासाठी ६ लाख, कुष्ठरुग्णांना अनुदान प्रतिमहा ४०० लाभार्थी अपेक्षित धरून त्यासाठी ७२ लाखांची तरतूद, परिवहनच्या दोन बसेस उपलब्ध करून देऊन त्यासाठी १ कोटी ४० लाख, गडकरी, डॉ. काशिनाथ घाणेकर येथे नाट्य कल्याणकारी कार्यक्रमांमध्ये ५० टक्के सवलत देत ५ लाखांची तरतूद, वैद्यकीय अर्थसाहाय्य १०० लाभार्थ्यांसाठी ५ लाखांची तरतूद, शासनाच्या विविध योजनांसाठी १० लाख, १०० टक्के अंध, १०० नि:समर्थांसाठी अनुदानात ५०० लाभार्थी अपेक्षित धरून यासाठी ९० लाख, आदींसह इतर योजनांसाठी अशी मिळून सुमारे ८.५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
अपंगांसाठीचा खर्च कागदावरच
By admin | Published: April 04, 2015 4:33 AM