- गोविंद शिंदे (बारूळ जि.नांदेड)
बाचोटी, (ता. कंधार, जि. नांदेड) येथील शेतकरी अशोक पाटील भोसकर यांनी केलेल्या प्रयोगातून ठिबकचे आयुष्यमान १० वर्षांनी वाढले. याशिवाय जमीन व पिकांचेही नुकसान टळले. त्यांनी केवळ ३५० रुपये खर्च करून ठिबकचे नूतनीकरण केले. यात त्यांना एक नव्हे, दोन नव्हे सुमारे ५० हजारांचा फायदा झाला. त्यांच्या या प्रयोगाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा झाली आहे.
पाण्याची बचत आणि पिकाला पुरेसे पाणी मिळण्यासाठी सध्या प्रत्येक शेतकऱ्याकडे ठिबकद्वारे सिंचन केले जाते. ठिबकद्वारे पिकाला पाणी, विविध प्रकारची खते, विविध प्रकारची औषधी सोडली जातात. त्यामुळे ठिबकचा वापर ४ वर्षांपेक्षा जास्त करू शकत नव्हते. कारण सर्व प्रकारची औषधे, खतामुळे ठिबकचे छिद्र बंद पडून खराब होत होते. त्यामुळे ठिबकचे आयुष्यमान जास्तीत जास्त ४ वर्षे टिकत होते. यातून धडा घेत अशोक पाटील भोसकर यांनी वेगळे काही तरी करायचे जेणेकरून पैसा वाचेल, ठिबकचे आयुष्यही वाढेल, असा निश्चय केला.
त्यांनी शेतात दोन लाकडी खांब उभे करून ३ इंची पीव्हीसी पाईप ४० फुटांच्या अंतराने दोन्ही खांबांना बांधून अर्धचंद्र आकारात तयार केले. त्यात सात लिटर अॅसिड सोडून प्रत्येक ठिबकचा पाईप एका बाजूला सोडून दुसऱ्या बाजूने काढून घेत होते. त्यामुळे अॅसिड प्रमाण ठिबकच्या नूतनीकरणास उपयोगाला आले. जे ठिबक ४ वर्र्षे वापरत होते, ते आज १० वर्षांपर्यंत वापरता येते.
या शेतकऱ्याने केवळ ३५० रुपयात ७ लिटर अॅसिड खरेदी केले, उर्वरित सर्व साहित्य शेतातीलच वापरले. आजघडीला ५० ते ६० हजार रुपये खर्चून ठिबक खरेदी करावे लागत होते, ते या प्रयोगामुळे गरज पडली नाही. भोसकर यांना २२ एकर शेती असून, त्यातील ११ एकर ठिबक सिंचनाची आहे. त्यांच्या शेतात सध्या हळद, ऊस, कापूस असून, शेताच्या बांधावर आवळा, बांबू, साग आदींचे ते उत्पादन घेतात.