ठाणे : ठाण्यात मोठा गाजावाजा करत पार पडलेल्या ९६ व्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनाचा खर्च अडीच कोटींवर जाण्याची दाट शक्यता आहे. सध्या संमेलनाचा हिशेब मांडण्याचे काम सुरू असून आठवडाभरातच संमेलनाचा ताळेबंद सादर केला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. स्टेजचा खर्च ६० लाख आणि जेवणाचा खर्च ४० लाख झाल्याचे सांगितले जात होते. ठाण्यात १९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत दादोजी कोंडदेव स्टेडियम, मासुंदा तलाव, गडकरी रंगायतन, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह या चार मुख्य ठिकाणी नाट्यसंमेलनाचे कार्यक्रम पार पडले. त्याआधी वातावरणनिर्मितीसाठी शहरातील विविध भागांत सात दिवस कार्यक्रम झाले. मुख्य सभामंडपातील भव्य-आकर्षक सेट व मासुंदा तलावातील फ्लोटिंग स्टेज हे तर ठाण्यासह सर्वांच्या चर्चेचा विषय ठरले. या स्टेजसाठीच आयोजकांना लाखो रुपयांची तजवीज करावी लागली होती. त्यानंतर आमदार प्रताप सरनाईक यांनी नाट्यरसिकांना दिलेले भोजनच ३० लाखांपेक्षा अधिक रकमेचे होते. याखेरीज, पाहुण्यांची निवास व्यवस्था, भोजन, प्रवास, काहींचे मानधन, निमंत्रण, चहापानासह अहोरात्र केलेले आदरातिथ्य यातून या नाट्यसंमेलनाने कोटींची उड्डाणे घेतली. थाटामाटात केलेल्या नाट्यसंमेलनातील मोजके कार्यक्रम वगळता अन्य ठिकाणी प्रेक्षकांची उपस्थिती तुरळकच होती. पण नाट्यपरंपरा जपण्यासाठी आयोजकांना काही पथ्ये पाळावी लागली. परिसंवाद ठेवावे लागले. त्यामुळे खर्च मात्र कोटींवर गेला. हिशेबाला वेळ लागतो! ‘अडीच कोटींच्या खर्चाचा हिशेब करायला वेळ लागतो. त्यामुळे पुढच्या आठवड्यापर्यंत हा ताळेबंद सादर होईल,’ असे एका पदाधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. २०१० साली ठाण्यात अ.भा. मराठी साहित्यसंमेलन पार पडले. त्या संमेलनाचा खर्च एक कोटी १६ लाख रुपये झाला होता. त्यानंतर, पाचच वर्षांत खर्चाने दुप्पट उडी घेतली आहे.
नाट्यसंमेलनाचा खर्च अडीच कोटींवर?
By admin | Published: March 20, 2016 3:03 AM