मुंबई : मुंबईत मोनो रेलचे जाळे पसरविण्याचा निर्णय घेतलेला असतानाच, सध्या सुरू असलेल्या मोनो रेलची अवस्था मात्र दयनीय झालेली आहे. प्रवाशांचा अभाव आणि उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त होत असल्याने उत्पन्न वाढवायचे तरी कसे, या विवंचनेत सध्या एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) आहे. महिन्याकाठी जवळपास १ कोटी ७८ लाखांचा खर्च मोनो रेलच्या देखभाल, दुरुस्ती आणि अन्य कार्यांवर होत आहे. फेब्रुवारी २0१४ मध्ये चेंबूर ते वडाळा डेपो हा ८.९३ किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आणि भारतातील पहिली मोनो रेल धावली. मोनो रेल सुरू होताच पहिल्या आठवड्यात १ लाख ३६ हजार प्रवासी मिळाले. त्या वेळी तिकीट विक्रीतून जवळपास १४ लाख रुपये मिळाले होते. जूनपर्यंत मोनो रेलला प्रवासी मिळतच गेले व त्या वेळी उत्पन्न हे जवळपास ४२ लाख एवढे झाले. मात्र, मोनोपर्यंत पोहोचण्यासाठी मुंबईकरांना करावी लागणारी कसरत पाहता, त्याला नंतर अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत गेला आणि धावत असलेली मोनो कितपत यशस्वी ठरेल, यावर अनेक चर्चा सुरू झाल्या. अल्प प्रतिसाद मिळत गेल्याने, प्रवासी कमी झाले आणि त्यामुळे उत्पन्नावरही परिणाम झाला. मोनोच्या वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेण्यात आले असून, हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मात्र, कमी झालेले प्रवासी आणि उत्पन्न यामुळे सध्या मोनोची अवस्था दयनीय झाली आहे, तरीही मोनोचा गाडा हा सुरूच आहे. सध्या दररोज १८ हजार ते २४ हजारांदरम्यान प्रवासी मोनो रेलतून प्रवास करत आहेत. त्यातून फक्त २ लाख ४0 हजार एवढेच उत्पन्न मिळत असल्याचे एमएमआरडीएतील सूत्रांकडून सांगण्यात आले, तसेच अन्य स्रोत असलेल्या योजनांमधून फारसे उत्पन्न मिळत नसल्याचेही समोर आले आहे. मोनो रेलच्या सुरक्षेसाठी महिन्याकाठी ८८ लाख रुपये खर्च येत आहे, तर देखभाल, दुरुस्ती आणि चलनीय खर्च ९0 लाख रुपये आहे. (प्रतिनिधी)>मोनो स्थानकांवर शुकशुकाट : चेंबूर ते वडाळादरम्यान व्हीएनपी व आरसी मार्ग, फर्टिलायझर टाउनशिप, भारत पेट्रोलियम, म्हैसूर कॉलनी, भक्ती पार्क ही स्थानके येतात. यातील काही स्थानकांवर शुकशुकाटच दिसून येतो.
उत्पन्नापेक्षा खर्च जास्त
By admin | Published: May 19, 2016 2:31 AM