यवतमाळ : कापसाचे दर सहा हजार रुपये क्विंटलचा टप्पा पार करतील, असा अंदाज असतानाच दरात अचानक घसरण झाली आहे. पाच हजार ७०० च्या घरात असलेला कापसाचा दर आता पाच हजार ४०० ते पाच हजार ५७० रुपयांवर स्थिरावला आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी हादरले आहेत.जागतिक बाजारात कापसाचे दर अधिक आहेत. मात्र, कापसाला मागणी कमी आहे. स्थानिक पातळीवर सरकीच्या दरात झालेल्या घसरणीचाही परिणाम कापसाच्या दरावर झाला आहे. स्थानिक पातळीवर ढेपेची मागणीही घटली आहे. बाहेर देशात ढेपेला फारशी मागणी नाही. यामुळे सरकीचे दरही दोन हजार ८५० रुपयांवर स्थिरावले आहेत. खुल्या बाजारात रुईचे खंडीचे दर ४३ हजार रुपयांवरून ४१ हजार रुपयांपर्यंत घसरले आहे. जागतिक बाजारात कापसाच्या प्रतीखंडीचे दर ४४ हजार ९५६ रुपये आहेत. त्यातही घसरण झाली आहे. त्याचा परिणाम कापसाच्या दरावर होऊन कापसाचे दर गडगडले आहेत. परळी येथे कापसाचे दर पाच हजार ८५० रुपये असून, विदर्भात मात्र, हेच दर पाच हजार ५०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. (शहर वार्ताहर)
कापसाच्या दरात एकाएकी घसरण
By admin | Published: February 09, 2017 2:43 AM