अकोला : मागील आठवड्यात खासगी बाजारपेठेत घसरलेल्या कापसाच्या दरात अल्पशी सुधारणा झाली असून, गुरुवारी हमीदरापेक्षा प्रतिक्विंटल शंभर रुपयांची वाढ झाली आहे. खासगी बाजारात आजमितीस शेतकर्यांनी १४ लाख ९१ हजार ३३५ क्विंटल कापूस विकला आहे. त्यातुलनेत पणन महासंघाने अवघ्या ८ हजार ८४१ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. यावर्षी कापसाला ४१00 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव केंद्र शासनाने जाहीर केले; तथापि कापूस खरेदी करताना प्रतवारीचे निकष लावले जात असल्याने प्रत्यक्षात शेतकर्यांना ३९00 ते ३९५0 रुपये प्रतिक्विंटल भाव दिले जात आहेत आणि खासगी बाजारातही कापसाच्या दरात आतापर्यंत चढउतार होता; पण विक्रीची रक्कम तातडीने मिळत असल्याने शेतकर्यांची पसंत खासगी बाजारालाच आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत शेतकर्यांनी जवळपास १४ लाख ९१ हजार ३३५ क्विंटल कापूस व्यापार्यांना दिला आहे. दरम्यान, पाच दिवसांच्या सुटीनंतर सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाने जवळपास ८ हजार ८४१ क्विंटल कापसाची खरेदी केली; परंतु पणनच्या कापूस खरेदी केंद्राकडे कापसाची हवी तेवढी आवक नसल्याचे एकूण चित्र आहे. राज्यातील पणनच्या खरेदीची आकडेवारी बघितल्यास सर्वाधिक कापूस हा यवतमाळ खरेदी केंद्रावर ४,९४६ क्विंटल खरेदी करण्यात आला. नागपूर ९७४ क्विंटल, वणी ९७, अकोला ८१0, अमरावती ३0.0५, खामगाव ३६ क्विंटल २५ किलो, औरंगाबाद ४0.९५, परभणी ५४७, परळी १५.९५, जळगाव खान्देश १,३४२ क्विंटल तर नांदेडला अद्याप खरेदीच झाली नाही.
खासगी बाजारात कापसाचे दर शंभर रुपयांनी वाढले!
By admin | Published: November 20, 2015 2:06 AM