राजरत्न सिरसाट/अकोला: यावर्षी उशिरा सुरू झालेला पाऊस आणि पेरणीनंतर पडलेला पावसाचा ताण याचा कपाशीवर प्रतिकूल परिणाम झाला असून, राज्यातील कापसाचे उत्पादन यावर्षी ५0 टक्के घटण्याची शक्यता कृषितज्ज्ञांनी वर्तविली आहे. राज्यात जवळपास ३५ लाख हेक्टर क्षेत्र कापसाचे असून, त्यातील १७ लाख विदर्भ, १५ लाख हेक्टर मराठवाडा उर्वरित क्षेत्र खान्देशात आहे. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्याने शेतकर्यांनी जुलैनंतर पेरणीला सुरुवात केली. बीटी कापूस पेरणीची वेळ १५ जुलैपर्यंत होती. तथापि, शेतकर्यांनी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात बीटीची पेरणी केली. त्यानंतर पावसाचा मोठा खंड पडल्याने झाडाची वाढ खुंटली. सप्टेंबर महिन्यात कापसाला फुले, पात्या परिपक्व होण्याची अवस्था असते. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात कापसाची बोंडं परिपक्व होऊन कापूस वेचणीला येतो. दसरा, दिवाळी सणाला कापूस वेचणीचा शुभारंभ करतात; परंतु पावसाचा ताण पडलेल्या कापसाची कोरडवाहू क्षेत्रात वाढ खुंटली असून, दोन इंच वाढलेल्या कापसाच्या झाडाला आताच फुलोरा येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. हेच झाड अपरिपक्वतेचे प्रमाण असल्याने त्याचा कापूस उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. विदर्भाचा विचार केल्यास यंदा सर्वाधिक कापसाचे १५ लाख हेक्टर क्षेत्र पश्चिम विदर्भात आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती व यवतमाळचा पांढरकवडा व वर्धा जिलचा भाग सोडला तर उर्वरित अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या चार जिल्हय़ात सरासरी ४0 टक्के पाऊस अद्याप कमी आहे. विदर्भातील पावसाची स्थिती बघता कापसाचे उत्पादन ४0 ते ५0 टक्क्याच्या जवळपास होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये पाऊस आला तरी उत्पादनात फारशी वाढ होईल, असे वाटत नाही. कारण कोरडवाहू क्षेत्रात वाढ खुंटलेल्या झाडांना अपेक्षित पात्या, फुले धरलेच नसल्याचे डॉ. पंदेकृविचे माजी कुलगुरू डॉ. शरदराव निंबाळकर यांनी सांगीतले.
*पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम
मराठवाडा, खान्देश व विदर्भात कापूस हे नगदी पीक घेतले जाते. तथापि, यावर्षी पेरणीनंतर पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने या पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादन घटणार हे निश्चित मानले जात आहे.