अकोला : यावर्षी विदर्भात सात ते दहा लाख हेक्टर कापसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे बीटी कापूस कंपन्यांनी आतापासूनच शेतकर्यांना अधिक बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठीची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, यंदा सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता शेतकर्यांत वर्तविण्यात येत आहे. राज्यातील कापसाचे क्षेत्र हे ४१.४६ लाख हेक्टर होते; परंतु उत्पादनखर्चाच्या तुलनेत कापसाला भाव मिळत नसल्याने कापसाचे क्षेत्र प्रचंड घसरले आहे. विदर्भातील शेतकर्यांनी कापसाचे क्षेत्र कमी करुन, सोयाबीन या पिकाकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षात सोयाबीनचा पेरा राज्यात ३१.६२ लाख हेक्टरपर्यंत पोहोचला आहे. पश्चिम विदर्भात सर्वाधिक १८ ते २0 लाख हेक्टर सोयाबीन क्षेत्रात वाढ झाली आहे. विदर्भात २२ लाख हेक्टरपर्यंत सोयाबीनचे क्षेत्र पोहोचले आहे. दरम्यान,२0१३ मध्ये झालेली अतवृष्टी आणि २0१४ मधील अल्प पावसाचा सोयाबीन पिकाला जबर फटका बसला असून, हंगामाच्या काळात आलेला अवकाळी पाऊस, गारपिटीने सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे गत दोन वर्षांपासून प्रमाणित सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी अप्रमाणित बियाणे शेतकर्यांच्या माथी मारल्याने बियाणे उलटले. त्यामुळे शेतकर्यांना गत खरीप हंगामात शेतकर्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. यंदाही तीच परिस्थिती असल्याने शेतकरी कापसाचे नियोजन करताना दिसतो आहे. त्यामुळे यंदा कापसाचे क्षेत्र सात ते दहा लाख हेक्टरने वाढण्याची शक्यता आहे; पण मान्सून कसा असेल, यावर सर्व अंवलबून असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
*कापसाचे दर घसरल्याने शेतकरी साशंक यंदा सुरुवातीपासून कापसाचे दर घसरल्याने शेतकरी सांशक आहेत आणि सोयाबीनचे दरही वाढले नाहीत. गेल्या वर्षी बोगस सोयाबीन बियाण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकरी वेगळ्य़ा पीक पद्धतीचा विचार करीत आहेत. असे असले तरी विदर्भातील शेतकर्यांचे कापूस हे पारंपरिक पीक असल्याने कापसाचा पेरा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही विदेशी संकेत स्थळावर यंदा पाऊस चांगला असेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.