देवळी(वर्धा) : येथील साबाजी जिनिंग फॅक्टरीला मंगळवारी सायंकाळी ४ वाजता लागलेल्या भीषण आगीत रुई गाठी व गंजीवरील साडेतीन हजार क्विंटल कापूस आगीच्या भक्ष्यस्थानी गेला. यामध्ये सुमारे तीन कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. जिनिंगला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या १० मिनिटातच कापूस वाहून नेणार्या पाईपमध्ये ठिणगी पडल्याने ही आग लागल्याचे बोलले जात आहे.आग लागल्यानंतर तब्बल दीड तासाने उत्तम गल्वा कंपनीचे अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहचले. लगेच मदत कार्याला सुरवात झाली़ तोपर्यंत आगीने जिनिंग फॅक्टरीला चारही बाजूने आपल्या कवेत घेतले होते. हवेमुळे जिनिंग परिसरात धुर पसरल्याने काळोख पसरला होता. ज्वाला व धुरामुळे परिसरातील वातावरण कोंडल्यागत झाले होते़ त्यामुळे जीन परिसराला पाण्याची व्यवस्था असून सुध्दा पाण्याचे व्हॉल्व्ह सुरू करता आले नाही़ या आगीमध्ये कापसाच्या रूई गाठी असलेले गोडाऊन जळून भस्मसात झाले़ तसेच साडेतीन हजार क्विंटल कापूस असलेल्या ३ गंज्यामधील कापूस २ फुटापर्यंत जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ (प्रतिनिधी)
वर्ध्यात तीन कोटींचा कापूस राख
By admin | Published: May 06, 2014 8:27 PM