मुंबई : चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांच्या माध्यमातून कोथरूड भागात घरकाम करणाऱ्या महिलांना दिवाळीच्या निमित्ताने साड्यांचे वाटप केले. या साडी वाटपाबाबत अनेकांनी आक्षेप घेतल्याचे पाहायला मिळाले होते. आता याच मुद्यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी प्रतिकिया देत चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहेत. चंद्रकांत पाटलांकडून वाटप करण्यात आलेल्या साड्यांसाठी पैसे कुणाचे होते. असे प्रश्नचिन्ह पवारांनी उपस्थित केले आहे.
एका खाजगी वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीच्यावेळी अजित पवार म्हणाले की, भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघात 1 लाख साड्या वाटप केल्याचे मला मिडिया व सोशल मिडियाच्या माध्यमातून कळाले आहे. याबाबतीत मी माझ्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र कोथरूडमध्ये पाटील यांनी वाटलेल्या 1 लाख साड्यांसाठी पैसा कुणी व कसा खर्च केला असे अजित पवार म्हणाले.
तर पुढे बोलताना ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी 1 लाख साड्या वाटण्याचे कारण काय आहेत. पाटील हे याआधी दोनदा विधान परिषेदेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यावेळी त्यांनी कधीच साड्या वाटल्या नव्हत्या. मात्र आताच साड्या वाटाव्यात असे त्यांना का वाटले? तसेच त्यासाठी त्यांनी पैसे कुठून आणले? असे प्रश्नचिन्ह सुद्धा पवारांनी यावेळी उपस्थित केले आहे.
विशेष म्हणजे बुधवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा पुण्यातील खंडाजीबाबा चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. ''आम्हाला हवी विकासाची गाडी, नको आम्हाला चंपा साडी'', ''भ्रष्टाचाराची साडी चंपा साडी'', अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. पाटील यांनी पुणेकरांची माफी मागायला हवी. त्यांची आमदार होण्याची सुद्धा पात्रता नाही. त्यांनी राजीनामा द्यावा. मतदारांना मतदानाच्या आधी आणि नंतर प्रलोभने दाखवणे कायद्याने गुन्हा असल्याचा आरोप सुद्धा यावेळी आंदोलकांकडून करण्यात आला.