मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सध्या सर्दी, खोकला, घसादुखी आणि तापाच्या औषधांची मागणी वाढली आहे. मात्र डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणत्याही व्यक्तीला औषध न देण्याची भूमिका केमिस्ट, फार्मासिस्टने घेतल्यामुळे या औषधांची योग्य विक्र ी होत असल्याचे संघटनांनी सांगितले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यातच पावसाने जोर धरल्याने व्हायरलची साथ आहे. परिणामी, अशी लक्षणे जाणवताच लोक औषधांच्या खरेदीसाठी धाव घेत आहेत. डोकेदुखी, खोकला, अंगदुखी, शिंका, घशाची खवखव असे त्रास एरवीही अनेकांना होत असतात. अशा रुग्णांना गरजेनुसार डॉक्टर औषधे देत असतात. याविषयी, महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी सांगितले की, कायमच अशा लक्षणांचा संबंध कोरोनाशी असेलच असे नाही. मात्र सध्या कोरोनाचा प्रकोप पाहता प्रिस्क्रिप्शन तपासूनच रु ग्णांना औषध देण्यात येत आहे. सध्या पॅरासिटेमॉल, अझथ्रिमायिसन अशा औषधांची मागणी प्रचंड वाढलीआहे.