मुंबई : नागपूरचा महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्प आणि विदर्भातील पर्यटनाला चालना देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विविध देशांच्या वाणिज्य दूतांना (कौन्सिल जनरल्स) ‘डेक्कन ओडिसी’ या अलिशान रेल्वेगाडीने नेणार आहेत. या कौन्सिल जनरल्सची एक बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर आज झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. हे कौन्सिल जनरल्स’ नागपुरात येतील त्या दिवशी विदर्भातील गुंतवणुकीच्या दृष्टीने ‘अॅडव्हान्टेज विदर्भ’ सारखे भव्य प्रदर्शन आयोजित करण्याचा मानसही मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत व्यक्त केला. औद्योगिक गुंतवणूक आणि पर्यटनक्षेत्रात गुंतवणुकीला विदर्भात प्रचंड वाव असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आजच्या बैठकीत मिहानच्या विकासाबाबतचे सादरीकरण एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांनी तर आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबतचे सादरीकरण एमएडीसीच्या अधिकाऱ्यांनी केले. नागपुरातील प्रस्तावित आॅरेंज सिटी स्ट्रिट या संकल्पनेचे तसेच, नाग नदी सौंदर्यीकरणाबाबतचे सादरीकरण श्रावण हर्डीकर यांनी केले. नागपुरात पूर्वी अंबाझरी आॅर्डनन्स फॅक्टरीपर्यंत जाणाऱ्या रेल्वेलाईनची जागा महापालिकेच्या ताब्यात असून या ३८ एकरच्या पट्टयात आॅरेंज सिटी स्ट्रिट योजना राबविली जाणार आहे. तिची उभारणी खासगीकरणातून केली जाईल. या पट्टयामध्ये व्यावसायिक संकुले, निवासी इमारती, परवडणारी घरे, मनोरंजन पार्क, इस्पितळ, हॉटेल्स, शैक्षणिक संकुले आदींची उभारणी करण्यात येणार आहे. नागनदीची स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाचा १४०० कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. शहराच्या मधोमध वाहणाऱ्या या नदीची आज बकाल अवस्था आहे. ेआता या नदीच्या १७ किलोमीटर लांबीच्या पट्टयाचे सौंदर्यीकरण करण्यात येईल. (प्रतिनिधी)
कौन्सिल जनरलांची डेक्कन ओडिसी जाणार विदर्भात
By admin | Published: June 24, 2016 5:27 AM