मुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवरुन विधान परिषदेतील गदारोळ शुक्रवारी बाराव्या दिवशीदेखील सुरुच राहीला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडल्याने अवघ्या दीड मिनिटात दिवसभराचे कामकाज तहकूब करावे लागले. दुपारी बारा वाजता सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होण्याआधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जमा होत घोषणाबाजीला सुरुवात केली होती. या गदारोळातच उपसभापती माणिकराव ठाकरे सभागृहात दाखल झाले. तरीही विरोधकांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला. शेतकरी कर्जमाफीची मागणी करतानाच सरकारच्या निषेधाच्या घोषणाही सुरुच होत्या. उपसभापती ठाकरे वारंवार सदस्यांना आपापल्या जागेवर जाण्याची सूचना करत होते. मात्र त्याकडे विरोधी सदस्यांनी साफ दुर्लक्ष केले. अखेर वाढत्या गदारोळामुळे माणिकराव ठाकरे यांनी दिवसभराचे कामकाज तहकूब करण्याची घोषणा केली. (प्रतिनिधी)
बारावा दिवसही कामकाजाविनाच कर्जमाफीवरुन परिषद ठप्प
By admin | Published: March 25, 2017 12:35 AM